सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी तालुक्यातील चारगाव चौकी परिसरात गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. बस पकडण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेलू येथील रहिवासी रविंद्र मालेकर (वय ४८) हे आपल्या मुलीसह चारगाव चौकी येथे आले होते.परंतु कोरपना-वणी मार्गावरील बस त्यांच्या समोरून निघून गेली. बस पकडण्याच्या उद्देशाने त्यांनी दुचाकीचा वेग वाढवत बसच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चारगाव चौकीजवळील पेट्रोल पंप परिसरात दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे ते थेट बसच्या मागील चाकाजवळ पडले आणि गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मात्र सुदैवाने दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी अपघातातून बचावली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या अनपेक्षित दुर्घटनेमुळे शेलू गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मालेकर यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.


























