सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मद्यविक्रीशी संबंधित व्यवसायांमध्ये शिस्त व पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने वणी पोलिसांनी बार, रेस्टॉरंट, वाईन शॉप आणि बिअर शॉप चालकांची विशेष बैठक आयोजित केली. पोलीस स्टेशन वणी येथे सायंकाळी झालेल्या या बैठकीस परिसरातील १७ व्यावसायिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान व्यवसायिकांना विविध महत्त्वपूर्ण नियमांची माहिती देत त्यांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. परवानगीप्राप्त वेळेच्या मर्यादेतच व्यवसाय सुरू ठेवावा, तसेच निर्धारित वेळेपूर्वी किंवा नंतर कोणत्याही प्रकारची विक्री अथवा सेवा देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले.

यासोबतच १८ वर्षांखालील अल्पवयीन व्यक्तींना मद्याची विक्री केल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला. व्यवसायाच्या ठिकाणी तसेच परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून किमान एक महिन्याचे फुटेज उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ग्राहकांच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे सांगण्यात आले.
याशिवाय संबंधित आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची संपूर्ण नोंद ठेवून त्यासंबंधीचे रजिस्टर अद्ययावत ठेवणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या शेवटी, वरील सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वणी पोलिसांकडून देण्यात आला.

























