सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
तालुक्यातील शिरपूर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत एक मोठे यश संपादन केले आहे. वणी परिसरात सुरू असलेल्या ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर येथील राजीक अन्सारी याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा मोठा तस्कर जाळ्यात अडकल्याने अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
या संपूर्ण कारवाईची पाळेमुळे काही महिन्यांपूर्वीच्या एका घटनेशी जोडलेली आहेत. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शिरपूर पोलिसांनी एका कारवाई दरम्यान श्रेयश ऊर्फ गुड्डू पाटील नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी ५७.१ ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) नावाचे घातक अंमली पदार्थ आणि सुमारे ५ लाख ६० हजार रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त केला होता.

असा लागला मुख्य सूत्रधाराचा सुगावा:
गुड्डू पाटील याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली. या तपासादरम्यान, वणी आणि परिसरात होत असलेल्या अंमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे नागपूरच्या राजीक अन्सारीचा मुख्य हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हा संपूर्ण रॅकेटचा ‘बॉस’ असून तोच मागून सूत्रे हलवत असल्याचे स्पष्ट झाले.
या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी नागपूरमध्ये सापळा रचून अत्यंत गुप्ततेने ही कारवाई केली आणि राजीक अन्सारीला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, पुढील चौकशीसाठी पोलिसांना त्याची कोठडी मिळाली आहे.
पुढील तपास सुरू:
राजीक अन्सारीच्या अटकेमुळे या रॅकेटचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, नागपूरहून वणी परिसरात ड्रग्स कसे आणले जात होते आणि यामध्ये आणखी कोणकोणत्या मोठ्या नावांचा समावेश आहे, याचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. शिरपूर पोलिसांचे पथक ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणी अधिक तपास करत आहे.


























