सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
सामाजिक बांधिलकी: विलास झट्टे यांनी आनंद बालसदनातील चिमुरड्यांसोबत रंगवला वाढदिवसाचा रंग…

आपल्या सहज, साध्या आणि निगर्वी स्वभावामुळे अवघ्या महाराष्ट्रात ‘साधा माणूस’ म्हणून परिचीत असलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व कलाकार विलास झट्टे यांनी आपला वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. झगमगाट आणि पार्ट्यांच्या जमान्याला फाटा देत त्यांनी जळका येथील ‘आनंद बालसदन’ या बालगृहाला भेट दिली आणि तेथील अनाथ व निराधार मुलांच्या सहवासात आपला वाढदिवस साजरा करत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

वाढदिवसाचे औचित्य साधत विलास झट्टे यांनी बालगृहातील मुलांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, कंपास पेटी, खोडरबर आणि टोकयंत्र अशा आवश्यक वस्तूंचा समावेश होता. हे शैक्षणिक साहित्य हाती पडताच मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून केक कापला आणि एकच जल्लोष केला.
या प्रसंगी अत्यंत भावूक होत विलास झट्टे म्हणाले, *”आज मी माझ्या वाढदिवसाचे निमित्त साधून एक मोठा संकल्प करत आहे. या बालसदनातील प्रत्येक अनाथ बालकाचा वाढदिवस यापुढे साजरा केला जाईल. या मुलांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पावती आणि वाढदिवसाची मौल्यवान भेट आहे.”* त्यांच्या या संवेदनशील विधानाने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचेच मन भरून आले.
विशेष म्हणजे, जळका येथील हे ‘आनंद बालसदन’ गेल्या सात वर्षांपासून शासकीय अनुदानाची प्रतीक्षा करत आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे या संस्थेला अद्याप हक्काची मदत मिळालेली नाही. अशा कठीण परिस्थितीत, कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न धरता विलास झट्टे यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करत या मुलांशी नातं जोडलं.
त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि संवेदनशीलतेचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. अशा वंचित संस्थांना आणि गरजू बालकांना समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी, असा एक मोलाचा संदेश या निमित्ताने समाजात गेला आहे.

























