सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घरफोडी आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात वणी पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगून केलेल्या धडक कारवाईत १ घरफोडी, १ घरफोडीचा प्रयत्न आणि १ बॅटरी चोरी अशा एकूण ३ गंभीर गुन्ह्यांची उकल केली असून, तीन अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून रोख रकमेसह २०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई…
वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मा. पो.नि. श्री. भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने (डी.बी. पथक) शहरात रात्रीची गस्त आणि पेट्रोलिंग वाढवली होती. दरम्यान, पोलिसांना त्यांच्या गोपनीय सूत्रांकडून काही संशयास्पद व्यक्तींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वणी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्हेगारांचा शोध सुरू केला.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी रंगनाथनगरी, वणी येथील सुमित राजु मानकर (वय २२ वर्षे) आणि राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (वय ३२ वर्षे) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी वणी शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
त्यांच्या कबुलीवरून पोलिसांनी खालील गुन्हे उघडकीस आणले…
१) अपराध क्रमांक ५५९/२०२६ (कलम ३०५(अ), ३३१(१) बी.एन.एस.) – घरफोडीचा गुन्हा.
२) अपराध क्रमांक ५७०/२०२६ (कलम ३३१(१), ३0५(अ), ६२ बी.एन.एस.) घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा.
बॅटरी चोरणारा आणखी एक आरोपी जाळ्यात… घरफोडीच्या गुन्ह्यांसोबतच पोलिसांनी आणखी एका वेगळ्या प्रकरणात कारवाई केली. यामध्ये २ महिला आरोपी आणि १ पुरुष आरोपी नामे विजय देवानंद मेश्राम (वय ३२ वर्षे, रा. नवीन लालगुडा, वणी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अपराध क्रमांक /२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस.अन्वये बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
पोलिसांनी या सर्व आरोपींकडून चोरीला गेलेली रोख रोकड आणि २ मोठ्या बॅटऱ्या, असा एकूण २०,९००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या पथकाने बजावली कामगिरी…

सदर कौतुकास्पद कामगिरी पांढरकवडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रॉबीन बन्सल (प्रभार वणी) आणि ठाणेदार मा. श्री. भानुदास पिदुरकर यांच्या थेट मार्गदर्शनात पार पडली. कारवाई करणाऱ्या डी.बी. पथकात प्रमुख पोउपनि सैय्यद साजीद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, मारोती पाटील, निलकमल भोसले, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर, चालक शुभम किन्नाके आणि पोलीस महिला अंमलदार चैताली चेन्डे यांचा समावेश होता. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.
(बातमीत एआई फोटो वापरले आहे…)

























