सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी तालुक्यातील बोर्डा येथे कौटुंबिक छळाची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सातत्याने होत असलेली पैशांची मागणी, मारहाण आणि मानसिक त्रास याला कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वणी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उषा सुनील पडवे (वय ३२, रा. बोर्डा) यांचा विवाह सन २०१३ मध्ये सुनील गजानन पडवे (वय ३८) याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर पतीने माहेरहून पैशांची मागणी सुरू केली. या मागणीसाठी उषा यांना वारंवार मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार सतीश तात्याजी चामाटे (रा. मंदार) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये घराच्या बांधकामासाठी त्यांनी बहिणीला आणि मेव्हण्याला अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. तरीही कर्ज फेडायचे कारण पुढे करून आणखी दोन लाख रुपये माहेरून आणण्याचा दबाव उषा यांच्यावर टाकण्यात येत होता.
तक्रारीनुसार, १० जुलै रोजी उषा यांनी भावाशी दूरध्वनीवर संपर्क साधून आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. मात्र त्यावेळी आणखी आर्थिक मदत करणे शक्य नसल्याचे भावाने सांगितले होते.
दरम्यान, घटनेच्या काही आठवडे आधी उषा यांनी आपल्या लहान बहिणी, मामा आणि मावशी यांच्याशीही पतीच्या वागणुकीबाबत मन मोकळे केले होते. दारूच्या नशेत पती मारहाण करीत असल्याचे तसेच पैसे आणले नाहीत तर जीव मारण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. या सततच्या जाचामुळे आपण जगण्यास कंटाळल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
रविवार, १९ जुलै रोजी सतीश चामाटे हे शेतीसाठी औषधे खरेदी करण्यासाठी वणी येथे आले असताना त्यांना बहिणीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने बोर्डा येथे धाव घेतली. तेथे नव्याने बांधलेल्या घरात उषा पडवे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
या घटनेनंतर मृत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून वणी पोलिसांनी आरोपी पती सुनील गजानन पडवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

























