सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
वणी येथील महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ या शासकीय कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात, निमंत्रण पत्रिकेत आणि बॅनरवर स्थानिक खासदारांचे नाव व छायाचित्र वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात असून, वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDO) निवेदन देऊन स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज एस.बी. हॉल, वणी येथे आदिवासी विकास मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महसूल विभागाचे हे शिबिर पार पडत आहे. शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत करत असतानाच, काँग्रेसने यातील प्रोटोकॉल उल्लंघनावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकेश पानघाटे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, स्थानिक खासदार हे मतदारसंघातील जनतेचे लोकनियुक्त प्रतिनिधी असतात. शासनाच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात नियमानुसार त्यांना योग्य स्थान व प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित आहे. परंतु, या कार्यक्रमाच्या सोशल मीडिया प्रचार साहित्यात, निमंत्रण पत्रिकेत आणि मुख्य बॅनरवर खासदारांचा समावेश करण्यात आलेला नाही.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
शासकीय प्रसिद्धी साहित्यातून आणि बॅनरवरून संबंधित खासदारांचे नाव व छायाचित्र वगळण्यामागील कारण प्रशासनाने स्पष्ट करावे.
भविष्यात महसूल विभाग किंवा शासनामार्फत आयोजित सर्व अधिकृत कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींना नियमानुसार व प्रोटोकॉलनुसार योग्य सन्मान व प्रतिनिधित्व देण्यात यावे.
प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या निवेदनावर वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश पानघाटे यांची स्वाक्षरी असून, हे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले आहे. शासकीय कार्यक्रमात प्रोटोकॉलचा फज्जा उडाल्याने आता प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























