सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
नगर परिषद प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येतून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. प्रभागातील सार्वजनिक ट्यूबवेलच्या (बोअरवेल) आजूबाजूला असलेल्या खुल्या नाल्यांमुळे बोअरमध्ये दूषित पाणी जाऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. या गंभीर समस्येची तत्परतेने दखल घेत प्रभाग क्र. १३ चे नगरसेवक सैफुर मोबीन रहमान यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची विनंती केली होती.

नगरसेवक सैफुर रहमान यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून नगर प्रशासनाने तात्काळ दखल घेत ट्यूबवेलभोवती काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता बोअरवेलमध्ये दूषित पाणी जाणे बंद होणार असून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगरसेवक सैफुर रहमान हे जनतेच्या समस्या सोडवण्यात नेहमीच अग्रेसर असतात. प्रभागातील नागरिक त्यांच्याकडे मोठ्या आशेने व विश्वासाने पाहतात. या कामाच्या सुरवातीमुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे ही माझी पहिली प्राथमिकता आहे. आगामी पाच वर्षांत जनतेच्या हितासाठीच मी सातत्याने कार्यरत राहीन. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही तुटू देणार नाही आणि जनतेच्या सेवेत नेहमी तत्पर राहीन.”— सैफुर मोबीन रहमान (नगरसेवक, प्रभाग क्र. १३, वणी)

























