सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
पहिल्याच फेरीत खाडेंनी केला विद्यार्थ्यांसोबत प्रवास; चालक-वाहकांचा सत्कार करत ग्रामीण जनतेने मानले आभार…
गेल्या दोन दशकांपासून बंद पडलेली वणी–उकणी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात कामगार नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाला मोठे यश आले आहे. सन २००५ पासून प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. मात्र, खाडे यांनी मैदानात उतरून रस्त्यावरचा लढा आणि प्रशासकीय दरबारी थेट धडक दिल्याने एसटी प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले. आज १ सप्टेंबर रोजी या मार्गावर लालपरी पुन्हा धावली असून, संजय खाडेंनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत बसमध्ये बसून पहिला प्रवास पूर्ण केला.
निवेदनांपलीकडे जाऊन दिला थेट लढा…
वणी परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात येताना रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. खासगी वाहतुकीचा भुर्दंड आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे पालक वर्ग मेटाकुटीस आला होता. ही व्यथा लक्षात येताच संजय खाडे यांनी या प्रश्नाला केवळ कागदी घोडे न नाचवता थेट आंदोलनाचे स्वरूप दिले. महिनाभरापूर्वी त्यांनी आगार व्यवस्थापकांना घेरून तातडीने सेवा सुरू करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे रोजचा पाठपुरावा कायम ठेवला.
खाडेंकडून चालक-वाहकांचा सन्मान, विद्यार्थ्यांशी थेट संवाद…
बसच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन करताना संजय खाडे यांनी चालक व वाहकांचा शाल व पुष्पहार घालून गौरव केला. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष प्रवासात शालेय व महाविद्यालयीन मुलांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या. २१ वर्षांनंतर गावात एसटी आल्याचे पाहून ग्रामस्थांनी पेढे वाटून आणि घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.
या परिसरातील प्रवाशांना थेट दिलासा…
या बसफेरीमुळे उकणीसह जुनाडा, पिंपळगाव, बोरगाव, भालर वसाहत आणि भालर परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी व रुग्णांची वणी शहराशी हक्काची सार्वजनिक जोडणी झाली आहे.
“केवळ आश्वासने देऊन जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी व्यवस्थेशी थेट दोन हात करावे लागतात. वणी–उकणी बससेवा ही या भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेली होती. हा लढा यशस्वी झाला असला तरी ग्रामीण भागातील इतर मूलभूत सोयी-सुविधांसाठी आमचा हाच आक्रमक बाणा कायम राहील.” संजय खाडे, कामगार नेते, महाराष्ट्र राज्य कांग्रेस सचिव…
‘खाडेंचा शब्द खरा ठरला’ — ग्रामस्थांची भावना…
अनेक वर्षे केवळ आश्वासनांवर बोळवण होत असलेल्या या मार्गावर खाडेंनी पुढाकार घेताच अवघ्या काही दिवसांत बस सुरू झाल्याने “खाडे यांनी दिलेला शब्द पाळून दाखवला,” अशा शब्दांत उकणी व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

























