सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
महाप्रसाद, भंडाऱ्यांवरील नियमांवर मंदिर महासंघ आक्रमक; शासनाकडे निवेदन…

आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजित होणाऱ्या महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदानाबाबत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियमांच्या अंमलबजावणीवर महाराष्ट्र मंदिर महासंघाने आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात महासंघासह विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी २ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यामार्फत राज्य शासनाकडे निवेदन सादर केले.
अन्नसुरक्षेला विरोध नाही, मात्र नियम सर्वांसाठी समान असावेत…
नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक असल्याचे मान्य करताना, अन्नसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी कोणत्याही विशिष्ट धार्मिक कार्यक्रमापुरती मर्यादित राहू नये, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे. धार्मिक उत्सवांमध्ये भाविकांच्या सहभागातून आणि देणग्यांच्या माध्यमातून होणारे अन्नदान हे व्यावसायिक खाद्यविक्रीपेक्षा वेगळे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाप्रसादाच्या परंपरेवर प्रशासकीय बंधने नकोत…
मंदिरांमध्ये श्रद्धा आणि सेवाभावातून वर्षानुवर्षे महाप्रसाद व भंडाऱ्यांची परंपरा सुरू आहे. अशा उपक्रमांकडे व्यावसायिक खाद्यव्यवसायाच्या निकषातून पाहून परवाने, नोंदणी किंवा कारवाईची प्रक्रिया लादू नये, अशी मागणी महासंघाने केली आहे. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास विरोध नसल्याचेही महासंघाने स्पष्ट केले.
निवडक कारवाईबाबत नाराजी…
अन्नसुरक्षेचे नियम लागू करताना धर्म, पंथ किंवा उत्सवाचा भेद न करता समान निकष असावेत. केवळ हिंदू धार्मिक कार्यक्रमांमधील महाप्रसाद किंवा भंडाऱ्यांकडे विशेष लक्ष दिल्यास समाजात गैरसमज आणि असंतोष निर्माण होऊ शकतो, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
धार्मिक परंपरा आणि अन्नसुरक्षा या दोन्ही बाबींचा समतोल राखत सेवाभावी उपक्रमांना अनावश्यक प्रशासकीय अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे वणी-मारेगाव-झरी तालुका अध्यक्ष अनुराग काठेड जैन यांच्यासह विविध मंदिरांचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. यात बबनराव धानोरकर, धीरज डाहुले, बालाजी म्हसे, वामन नांदे, रितेश शुगवानी, विनोद आसवानी, कृष्णा पूरवार, संदीप मदान, सिन्टू अग्रवाल, निकेत गुप्ता, प्रशांत नक्षणे, कैलाश दूधकोहळे, सुरेश बनसोड, लहू खामनकर आणि लोभेश्वर टोंगे यांचा समावेश होता.

























