सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया…
तालुक्यातील खाणप्रभावित क्षेत्रात येणाऱ्या कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील धोकादायक ठरलेल्या वर्गखोल्यांची समस्या अखेर मार्गी लागली आहे. या शाळेत दोन नवीन वर्गखोल्या उभारण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) अंतर्गत २३ लाख ५० हजार रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, सुरुवातीच्या २० टक्के निधीपोटी ४ लाख ७० हजार रुपयांचा पहिला हप्ताही तात्काळ वितरीत करण्यात आला आहे.
कवडशी हे गाव वेकोलिच्या बेलोरा, नायगाव आणि मुंगोली या कोळसा खाणींच्या अवघ्या ५ किलोमीटरच्या परिघात येत असल्याने थेट खाणबाधित क्षेत्रात मोडते. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. मात्र, शाळेच्या दोन जुन्या वर्गखोल्या अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. २४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात वर्ग सुरू असतानाच अचानक व्हरांड्याची भिंत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संभाव्य धोका ओळखून ग्रामपंचायत कार्यालयात तात्पुरते वर्ग भरवण्याची वेळ आली होती.
घटनास्थळावरून थेट पाठपुरावा आणि संघटित लढा:
भिंत कोसळल्याची घटना घडताच माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी घटनास्थळावरूनच वरिष्ठ प्रशासनाशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांची प्रत्यक्ष भेट घेतली. खाणबाधित क्षेत्रातील हक्काच्या खनिज विकास निधीतून नवीन वर्गखोल्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात, यासाठी शिष्टमंडळाने निवेदन सादर करत अतिशय प्रभावी व आक्रमक मागणी लावून धरली. विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दिलेल्या या संघटित लढ्यामुळे प्रशासनाला तातडीने दखल घेणे भाग पडले.
या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून या बांधकामास अंतिम प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ यवतमाळ यांच्यामार्फत लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नवीन सुरक्षित इमारतीचा मार्ग मोकळा झाल्याने कवडशीतील चिमुकल्यांचा शिक्षण प्रवास आता भयमुक्त वातावरणात होणार असून, या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.

























