सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःचे संपूर्ण आयुष्य एका जाज्वल्य यज्ञाप्रमाणे झोकून देणारे लोकनायक बापूजी अणे हे विदर्भाचे देदीप्यमान नेतृत्व होते, असे प्रतिपादन यवतमाळचे प्रसिद्ध अभ्यासक देवेंद्र प्रभुणे यांनी केले. विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि स्थानिक नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
स्थानिक नगर वाचनालयाच्या सभागृहात शनिवार, ५ सप्टेंबर रोजी तिथीनुसार लोकनायक बापूजी अणे यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ‘लोकनायक बापूजी आणि एक जाज्वल्य यज्ञकुंड’ या विषयावर प्रभुणे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष डॉ. अभिजीत अणे होते; तर व्यासपीठावर नगर वाचनालयाचे कार्यवाह गजानन कासावार आणि डॉ. दिलीप अलोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानातील प्रमुख मुद्दे :
संस्कार व विचारसरणी : बापूजींना वैदिक ज्ञान आणि संस्कृतचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. लोकमान्य टिळकांच्या विचारधारेचा वारसा पुढे चालवल्यामुळे ते विदर्भाचे ‘टिळक’ म्हणून ओळखले गेले.
जनआंदोलन व लढा : अन्यायी ब्रिटिश वनकायद्याविरुद्ध त्यांनी पुकारलेला जंगल सत्याग्रह हा त्यांच्या लोकनायक ठरण्यातील मैलाचा दगड ठरला.
विदर्भ अस्मिता : स्वतंत्र विदर्भाच्या संकल्पनेवर ठाम राहून त्यांनी दोनदा संसदेत विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. विदर्भ साहित्य संघाच्या उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा होता.
योगायोग : देशाला त्यांच्या कार्याची महती पटून ज्या दिवशी ‘पद्मविभूषण’ हा सर्वोच्च सन्मान घोषित झाला, त्याच दिवशी त्यांची जीवनज्योत विझली, हा अत्यंत हळवा क्षण प्रभुणे यांनी अधोरेखित केला.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. अभिजीत अणे यांनी खंत व्यक्त केली की, नागपूर करारातील विदर्भाच्या हक्काचा २२ टक्के सरकारी नोकऱ्यांचा वाटा आजतागायत पूर्ण मिळालेला नाही. बापूजींनी आयुष्यभर विदर्भाच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला, मात्र हे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय गंधेवार यांनी बापूजींवरील स्वरचित गीत सादर केले. अरुण कावडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रास्ताविक गजानन कासावार यांनी केले. ‘मस्त कलंदर’ ग्रंथाच्या निर्मितीबद्दल डॉ. दिलीप अलोणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते बापूजी अणे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन वि. सा. संघाचे उपाध्यक्ष अशोक सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन सचिव राजेश महाकुलकर यांनी केले. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे व राम मेंगावार यांनी सहकार्य केले.

























