सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
तालुक्यातील वडगाव (धं.) शिवारातील बनावट दस्तऐवजांच्या आधारे पार पडलेल्या वादग्रस्त जमीन खरेदी-विक्री प्रकरणाने आता मोठे राजकीय व प्रशासकीय वळण घेतले आहे. खोटी कागदपत्रे आणि बनावट विक्रीपत्राचा गैरवापर करून महसूल नोंदींमध्ये छेडछाड करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसह, त्यांना संरक्षण देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाची मलमपट्टी न करता त्यांची सेवेतून कायमची हकालपट्टी करावी, अशी थेट मागणी स्थानिक तक्रारदार सुरज चाटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख तथा माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

वडगाव (धं.) येथील जमिनीच्या सातबारा व फेरफार नोंदींमध्ये परस्पर खाडाखोड करून मूळ हक्कांवर गदा आणल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात आहे. बनावट दस्तांच्या जोरावर महसूल दप्तरात नोंदी चढवून हा व्यवहार पूर्णत्वास नेण्यात आल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून यामागील सूत्रधार व त्यांना सहकार्य करणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी चाटे यांनी लावून धरली आहे.
शासकीय कारभारावर आणि योजनांच्या अंमलबजावणीवर करडी नजर ठेवणारी विधिमंडळाची अंदाज समिती सध्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. नुकताच ११ सप्टेंबर रोजी या समितीने वणी तालुक्यात येऊन प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यानच हा गैरव्यवहार थेट समिती प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

जमीन हक्कांच्या सुरक्षेसाठी अशा गैरप्रकारांना चाप बसणे गरजेचे असून, विक्रीपत्राची कायदेशीर वैधता, नोंदी करताना अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका आणि दस्तऐवजांची सत्यता या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे. आता यावर अंदाज समिती आणि जिल्हा प्रशासन नेमके काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण वणी परिसराचे लक्ष वेधले गेले आहे.

























