सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख आशिषभाऊ खुलसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज वणी परिसरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शिवसैनिक, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करत शिवसेनेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रत्येक गावात भगवा फडकवण्याचा ठाम संकल्प केला आहे.

प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि धडाडीचे युवा नेतृत्व…
आशिष खुलसंगे यांच्याकडे जिल्ह्याच्या राजकारणाचा अनेक वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभव आहे. राजकारणातील खाचखळगे उत्तमरीत्या ठाऊक असलेले आशिषभाऊ हे केवळ पदापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने घेतलेली आक्रमक भूमिका आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालण्याची कार्यशैली यामुळे त्यांच्या नेतृत्वाला जिल्ह्यात मोठी मान्यता मिळत आहे.

ग्रामीण भागात भक्कम पकड आणि युवकांचे भक्कम जाळे…
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाच्या समस्यांची त्यांना सखोल जाण आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची सर्वात मोठी राजकीय ताकद ठरली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गावागावांत त्यांची मजबूत पकड असून युवकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. तरुणांची भाषा जाणणारा आणि त्यांच्या रोजगारासह स्थानिक प्रश्नांवर पाठीशी उभा राहणारा नेता म्हणून तरुण वर्ग त्यांच्याशी मोठ्या प्रमाणावर जोडला गेला आहे. या युवाशक्तीच्या बळावर ते पक्षसंघटनेला नवी ऊर्जा देत आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष…
जिल्हाप्रमुखपदाची धुरा सांभाळताना आशिषभाऊंच्या कार्यक्षमतेची खरी कसोटी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत लागणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला निर्णायक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढवणे, शिवसेनेच्या जागांमध्ये मोठी वाढ करणे, प्रत्येक मतदारसंघात विरोधकांना कडवे आव्हान देत विक्रमी मताधिक्य मिळवणे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे अभेद्य राजकीय स्थान निर्माण करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

























