सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, कोणतीही देवाणघेवाण न करता एका माजी शिक्षकाची आयुष्यभराची पुंजी लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वणी शाखेतील दोन वेगवेगळ्या खात्यांमधून अज्ञात सायबर चोराने तब्बल ३ लाख ६३ हजार रुपयांवर डल्ला मारला.

स्थानिक नटराज चौक भागात वास्तव्यास असलेले दिलीप रतनलाल कोचेटा (वय ६८) हे सेवानिवृत्त शिक्षक सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. २९ जुलै २०२६ रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या भ्रमणध्वनीवर बँक खात्यातून पैसे वळते झाल्याचे लागोपाठ संदेश आले.
मिनिटांत खाती रिकामी…
पहिल्या खात्यातून १ लाख ९५ हजार रुपये परस्पर वळते झाले.
काही क्षणांतच दुसऱ्या खात्यातून १ लाख ६८ हजार रुपये वजा झाल्याचा मेसेज धडकला.
अवघ्या काही मिनिटांत एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम खात्यांतून गायब झाली.
आपण कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक व्यवहार अथवा देवाणघेवाण केली नसतानाही हा प्रकार घडल्याने कोचेटा यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोर्टलवर तक्रार नोंदवून वणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या जबाबवरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
नागरिकांसाठी सायबर खबरदारी…
आपला ओटीपी, एटीएम पिन, यूपीआय पिन किंवा कार्डचा सीव्हीव्ही कोणाशीही शेअर करू नका.
अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक्स उघडू नका किंवा अनधिकृत ॲप्लिकेशन्स फोनमध्ये इन्स्टॉल करू नका.
खात्यातून संशयास्पद व्यवहार दिखताच तात्काळ बँकेचे खाते गोठवा (फ्रीज करा).
आर्थिक फसवणूक झाल्यास विनाविलंब १९३० या राष्ट्रीय सायबर सुरक्षा हेल्पलाईनवर संपर्क साधावा. तत्परतेने घेतलेली भूमिका गेलेली रक्कम परत मिळवून देण्यास उपयुक्त ठरते.

























