सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारा विघ्नहर्ता अशी ख्याती लाभलेल्या बाबापूर (कायर) येथील श्री गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान अलोट गर्दी उसळते. मात्र, भाविकांचा वाढता ओघ आणि रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी यामुळे दरवर्षी कायर-बाबापूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन भक्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहनतळाअभावी निर्माण होणारी ही गंभीर समस्या ओळखून ‘गजानन ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन’चे संचालक तथा उद्योजक जयंत मामीडवार यांनी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला असून, तब्बल चार एकर परिसरात भव्य व सर्वसोयींयुक्त पार्किंग व्यवस्था स्वखर्चाने उभी करून दिली आहे.
एका हाकेवर कोट्यवधींच्या श्रद्धेला दातृत्वाची साथ…यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाबापूर गणेशोत्सव समितीने भाविकांच्या पार्किंगची वाढती अडचण जयंत मामीडवार यांच्यासमोर मांडली. भाविकांची गैरसोय लक्षात येताच त्यांनी तत्काळ प्रतिसाद देत कसलाही विलंब न करता कामाला सुरुवात केली. स्वतःच्या क्रेशरमधून सुमारे २०० ते २५० ट्रक मुरूम, खडी व आवश्यक बांधकाम साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. सखल व खडकाळ अशा चार एकरांच्या जमिनीवर हा भराव टाकून सपाटीकरण करण्यात आले. त्यामुळे आज या ठिकाणी शेकडो चारचाकी व दुचाकी वाहने शिस्तबद्ध रीतीने उभी राहू शकतील असे प्रशस्त वाहनतळ साकारले आहे.
मंडळाच्या इतिहासातील ऐतिहासिक सहकार्य…
बाबापूर गणेश मंडळाच्या स्थापनेपासून आजतागायत लाभलेल्या सर्व मदतीमध्ये हे योगदान सर्वात मोठे व दिशादर्शक ठरले आहे. या दातृत्वामुळे केवळ वाहतुकीचा प्रश्नच मिटला नाही, तर दूरवरून येणाऱ्या वयोवृद्ध, महिला व बालकांना सुरक्षित व सुलभ दर्शन घेणे शक्य होणार आहे. या महत्त्वपूर्ण सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या २० सप्टेंबर रोजी बाबापूर ग्रामस्थ आणि गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जयंत मामीडवार व त्यांच्या परिवाराचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
“बाबापूर देवस्थानच्या संपूर्ण प्रवासात जयंत मामीडवार यांच्या रूपाने मिळालेले हे सहकार्य ऐतिहासिक आहे. भाविकांची वाढती गैरसोय आम्ही केवळ त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लाखो रुपयांचे साहित्य व मुरूम स्वखर्चाने उभे केले. त्यांच्या या औदार्यामुळे आज चार एकरांवर भव्य वाहनतळ पूर्णत्वास गेले आहे. बाप्पाच्या सेवेतील त्यांचे हे ऋण ग्रामस्थ आणि भाविक कधीही विसरणार नाहीत.”

























