सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
बळीराजाच्या सुखासाठी आ. देवराव भोंगळे यांची विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना…
बाबापूरच्या विकासासाठी व भाविकांच्या सोयींसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आमदारांचे आश्वासन…
पार्किंगच्या सुविधेसाठी २०० ट्रक मुरूम देणारे उद्योजक जयंत मामीडवार यांचा विशेष गौरव…
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात भाविकांच्या सोयीसाठी दातृत्वाचा हात पुढे करणारे विदर्भातील नामांकित उद्योजक जयंत मामीडवार तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांचे कायर व बाबापूर परिसरामध्ये ग्रामस्थ, पदाधिकारी आणि गणेशभक्तांच्या वतीने अतिशय जल्लोषात व उत्साहात स्वागत करण्यात आले.
रविवारी आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या सुविद्य पत्नीसह आणि उद्योजक जयंत मामीडवार यांनी संयुक्तपणे कायर गावाला सदिच्छा भेट दिली. कायर येथे आगमन होताच ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नागेश घणकसार व प्रतिष्ठित मोडक परिवाराने शाल आणि श्रीफळ देऊन आमदार भोंगळे दांपत्य व मामीडवार यांचा भावपूर्ण सत्कार केला. या प्रसंगी चंद्रपूरचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख, युवा व्यावसायिक योगेश मामीडवार यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्किंगच्या सुविधेसाठी २०० ट्रक मुरूम; बाबापुरात जयंत मामीडवारांचा गौरव…
कायर येथील आदरतिथ्यानंतर सर्व मान्यवर प्रसिद्ध बाबापूर सार्वजनिक गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झाले. या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची गैरसोय होऊ नये, यासाठी उद्योजक जयंत मामीडवार यांनी त्वरित दखल घेत चार एकरच्या विस्तीर्ण परिसरासाठी तब्बल २०० ट्रक मुरूम व क्रेशर खडी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली होती. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जयंत मामीडवार आणि संतोष जुनघरी यांचा मंडळाने शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक गौरव केला.
आमदार देवराव भोंगळे दांपत्याचाही जंगी सत्कार…
या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार देवराव भोंगळे आणि त्यांच्या पत्नी यांचाही बाबापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
“शेतकऱ्यांचे संकट दूर होऊ दे; बळीराजा सुखी होऊ दे!” — आमदार देवराव भोंगळे यांची बाप्पाचरणी याचना
बाबापूरच्या नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यानंतर आमदार देवराव भोंगळे यांनी मनोभावे प्रार्थना केली. ते म्हणाले, “हे बाप्पा, शेतकरी राजावर आलेले सर्व संकटे दूर कर. चांगला पाऊस पडू दे, पिकांचे नुकसान टळू दे आणि शेतात भरघोस पीक येऊ दे. कष्टकरी शेतकऱ्याच्या घरात, चेहऱ्यावर कायम सुख, समाधान आणि समृद्धी नांदू दे.”
यावेळी भाविकांना दिलासा देताना ते पुढे म्हणाले की, “बाबापूर येथे बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाविकांना उत्तम दर्जाच्या सुख-सोयी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून निधी मिळवून दिला जाईल.” असे ठोस आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.
“बाप्पाच्या सेवेचे भाग्य मला लाभले!” — जयंत मामीडवार…
सत्काराला उत्तर देताना उद्योजक जयंत मामीडवार म्हणाले, “बाबापूर येथे गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पार्किंगच्या जागेत मुरुमाची गरज असल्याचे समजताच कोणताही विलंब न करता आम्ही सामग्री उपलब्ध करून दिली. चार एकरच्या जागेत शिस्तबद्ध उभी असलेली हजारो वाहने पाहून मनाला अत्यंत समाधान लाभले. ही मदत नसून साक्षात बाप्पानेच माझ्याकडून ही सेवा करून घेतली आहे.

























