सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या परिचयातून एका १५ वर्षांच्या मुलीला धमकावून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडिओ मिळवणे, तसेच बदनामीची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
रक्षण पोनलावार (वय १९, रा. छोरिया लेआउट, वणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्रामवर या दोघांचा संपर्क आला होता. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या एका वैयक्तिक बाबीचा सुगावा तिच्या पालकांना देण्याची भीती दाखवून तिच्यावर मानसिक दबाव आणला. याच दहशतीच्या जोरावर त्याने पीडितेकडून आक्षेपार्ह छायाचित्रे आणि चित्रफिती मिळवल्या व त्या सार्वजनिक करण्याची सातत्याने धमकी दिली.
या ब्लॅकमेलिंगच्या पार्श्वभूमीवर, आरोपीने २१ मे २०२६ च्या रात्री पीडित मुलीस घराबाहेर बोलावून एका वाहनात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५१(२), ३५१(३), ६४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा (अपराध क्र. ९६९/२०२६) नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रियांका चौधरी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

























