सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
जागेवर लहान मुलांसाठी खेळणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था होणार: काँग्रेस नगरसेवकांचे आश्वासन…
प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली गंभीर डोकेदुखी अखेर कायमची संपली आहे. या प्रभागातील अनेक वर्षांपासून बंद असलेले, दुर्गंधीचे आगार बनलेले जुने सार्वजनिक शौचालय नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवक सैफुर रहमान यांच्या विशेष पुढाकारामुळे पालिकेतर्फे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले. या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अनेक वर्षांची नरकयातना संपली…
प्रभागातील हे शौचालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत धूळ खात पडून होते. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत होती आणि डुकरांचा मुक्त संचार वाढला होता. घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तसेच साथीचे आजार पसरण्याची सतत भीती निर्माण झाली होती. परिसरातील रहिवाशांचे जगणे अक्षरशः मुश्किल झाले होते. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.
नगरसेवकांचा प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा…
प्रभाग क्रमांक १३ मधून नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सैफुर रहमान यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे वारंवार भेटी देऊन निवेदने सादर केली आणि ठोस कारवाईसाठी सातत्यपूर्ण तगादा लावला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले असून पालिकेच्या पथकाने तातडीने जेसीबी आणून ही जुनी आणि धोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केली.
नागरिकांकडून आभार व समाधान…
“अनेक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्ष केलेली आमची ही मोठी समस्या नगरसेवक सैफुर रहमान यांच्या सक्रियतेमुळे अवघ्या काही दिवसांत मार्गी लागली,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. आता दुर्गंधीचा त्रास कायमचा संपला असून लहान मुले मोकळेपणाने खेळू शकतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
रिकाम्या जागेचा होणार सुशोभीकरण…
शौचालयाची इमारत पाडल्यानंतर मोकळ्या झालेल्या या जागेचा वापर परिसराच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. येथे लहान मुलांसाठी सुंदर खेळणी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे (बेंच) बसवण्याचा विचार असल्याचे प्रभाग क्रमांक १३ चे काँग्रेस नगरसेवक सैफुर रहमान व नगरसेविका अलकाताई मोखाडे यांनी स्पष्ट केले आहे. या आश्वासनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

























