सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहर व तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात वणी शहर व परिसरातील तब्बल ४०० ते ५०० महिलांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध आणि तांत्रिक त्रुटींमुळे रखडलेल्या अनुदानाबाबत काँग्रेस पक्षाकडे आपल्या तक्रारी नोंदविल्या.
कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना आवारी, तालुका महिला अध्यक्षा चंद्रकला उराडे, शहर महिला अध्यक्षा श्यामा तोटावार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विकेश पानघाटे, शहर अध्यक्ष जय आबड, काँग्रेस पक्षाच्या वणी नगरपरिषद गटनेत्या करुणा कांबळे आणि नगरसेविका अल्का मोवाडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पात्र महिलांना वंचित ठेवणे काँग्रेस खपवून घेणार नाही! यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. ‘लाडकी बहीण योजना ही सरसकट सर्व पात्र महिलांना मिळालीच पाहिजे, हा काँग्रेसचा ठाम विश्वास आहे,’ असे स्पष्ट करत नेत्यांनी सांगितले की, प्रशासकीय दिरंगाई, निष्काळजीपणा आणि त्रुटींच्या नावाखाली गरजू महिलांना हक्काच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही.
प्रत्येक वंचित बहिणीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील…जनता दरबारात उपस्थित राहिलेल्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासोबतच, ज्या महिला काही कारणास्तव या दरबाराला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत परंतु योजनेपासून वंचित आहेत, त्यांची बाजूही काँग्रेस खंबीरपणे मांडणार आहे. एकाही पात्र महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा विश्वास यावेळी देण्यात आला.
काँग्रेस पक्षाने याप्रश्नी आता आक्रमक भूमिका घेतली असून, या जनता दरबाराच्या माध्यमातून गोळा झालेल्या सर्व तक्रारी थेट शासन दरबारी मांडल्या जातील. जोपर्यंत प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस हा मुद्दा जनतेसमोर मांडत राहील आणि रस्त्यावर उतरून आक्रमक लढा देईल, असा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.

























