सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी..
वणी शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर वणी पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
कोणावर झाली कारवाई? पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार मोहम्मद जमील उर्फ मौलाभाई शेख एनल्हक, वय २३, रा. राजूर कॉलनी, ता. वणी याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात पोलीस स्टेशन वणी येथे विविध गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्या कृत्यांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला होता. तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
सध्या सार्वजनिक सण-उत्सव सुरू असल्याने अशा गुन्हेगारांमुळे शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता, वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. भानुदास पिदुरकर यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपीला मारेगाव आणि वणी तालुक्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला वरोरा हद्दीत नेऊन त्याच्या नातेवाईक व मित्रांच्या स्वाधीन करण्यात आले असून, ही सोपवणूक पोलीस स्टेशन वरोरा येथे करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भानुदास पिदुरकर आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
या कारवाईमुळे वणी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सणाच्या काळात पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शांतता राखण्यास मदत होणार आहे.

























