सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वणी शहरातील आंबेडकर चौक येथील नवशक्ती दुर्गामाता मंदिरात यंदा कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ही ज्योत मंदिरात दाखल होणार असून भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी दिली.
नवशक्ती दुर्गामाता मंदिर समितीने गेल्या काही वर्षांपासून देशातील विविध शक्तिपीठांमधून अखंड ज्योत आणण्याची नवीन परंपरा सुरु केली आहे. सुरुवातीच्या वर्षी माहूरगडच्या रेणुका मातेची ज्योत आणण्यात आली होती. त्यानंतरच्या वर्षी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची, तर गतवर्षी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील भद्रकाली मातेची ज्योत वणीत आणून स्थापना करण्यात आली होती. त्याच परंपरेतील चौथे वर्ष म्हणून यावर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची ज्योत आणण्याचा संकल्प समितीने केला आहे.
या ज्योतीचे पावित्र्य राखत विधिवत पूजा-अर्चा करून मंदिरात स्थापना केली जाणार आहे. या निमित्ताने यंदाच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात अधिक भक्तिमय वातावरणात होणार आहे.
१० ऑक्टोबरला ज्योतयात्रेला सुरुवात…
या ज्योतीसाठी मंदिर समितीची ज्योतयात्रा १० ऑक्टोबर रोजी वणीहून कोल्हापूरकडे प्रस्थान करणार आहे. ११ ऑक्टोबर, रविवार – घटस्थापनेच्या दिवशी कोल्हापूरात पोहोचून श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यानंतर तेथे विधिपूर्वक अखंड ज्योत प्रज्वलित केली जाईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, १२ ऑक्टोबर रोजी ती ज्योत वणीत आणून दुर्गामाता मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येईल.
या पवित्र यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वखर्चाने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष बेलुरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंदिर समितीशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नवरात्राच्या नऊ दिवसात मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्यासह शिवराम आसुटकर, नितीन बिहारी, अमोल बदखल, राजू शिरभाते आदी सहभागी होणार आहेत.
वणी शहर आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष रवि बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, अमोल बदखल, स्वप्नील बिहारी, राजकुमार अमरवानी, नितीन मसेवार, धम्मा मनवर, अशोक मांदाडे, संजय लोणारे, अविनाश कामटकर, विनोद मुथा, चंद्रकांत फेरवानी, राजू जयस्वाल, समीर लाभसेटवार, मनु महाराज तुगनायत आणि अशोकजी बतरा यांनी केले आहे.

























