वरिष्ठ पत्रकार श्रीवल्लभ सरमोकदम यांचे
नगराध्यक्ष, वणी यांना खुले पत्र
(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)
———————————————
मा. नगराध्यक्ष, वणी, जि. यवतमाळ
स.न. वि.वि.
पत्रास कारण की, आपण नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अनुक्रमे एप्रिल व आगस्ट महिन्यात तब्बल दोन वेळा स्वतंत्रपणे आपल्या कार्यालयात निवेदन सादर केले. या संदर्भात व्यक्तिशः आपण व नगर परिषद कार्यालयाकडून अधिकृतपणे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही; याचे आश्चर्य आणि खंत वाटते. सर्व नगराध्यक्षांचा कार्यकाळ दर्शविणारा अचूक फलक व शहराच्या रचनाकारांचे तैलचित्र पुनर्स्थापित करण्यासंदर्भातील ही दोन्ही निवेदने होती. अध्यक्षांचा फलक लावण्यात आला खरा पण तो सदोष असल्याचे दुसऱ्या निवेदनातून लक्षात आणून दिले होते. परंतू त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करुन हा दोष दूर करण्याची आवश्यकता नगर परिषदेला अद्यापही वाटली नाही. त्यामुळे हा फलक जड अंतःकरणाने लावण्यात आला की काय? ही शंका बळावते. रचनाकारांच्या तैलचित्राचा विषय तर अद्याप कोसो दूर असल्याचे एकूणच परिस्थितीवरुन दिसते. नगर परिषदेचे शताब्दी वर्ष निघून गेले. त्याची साधी चाहूलही वणीकरांना लागली नाही. त्यामूळे लोकनियुक्त नगर परिषद केवळ प्रशासनाच्या हातचे बाहुले झाले की नगर परिषदेच्या लेखी शहराची अस्मिता आटली? असा प्रश्न सुजाण वणीकरांसमोर उभा ठाकल्यास नवल राहणार नाही.
नऊ-दहा महिन्यांपूर्वी ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या दि. १२ जानेवारी २०२६ रोजी आपण वणी नगर परिषदेची सूत्रे शेकडो वणीकरांच्या साक्षिने हाती घेतली. शताब्दी पूर्ण केलेल्या नगर परिषद व वणीकरांसाठी निर्विवाद हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. दुसऱ्या अर्थाने शताब्दी वर्षपूर्ती नंतर लगेच आपल्या हाती शहराची सुत्रे येणे, खरोखर हा भाग्याचा क्षण म्हणावा लागेल. कोणत्याही संस्थेची शतकपूर्ती त्या संस्थेसाठी अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्या निमित्ताने मागिल शंभर वर्षातील एकूणच काळाची उजळण करुन शहराचा इतिहास पुनरुज्जीवित करण्याचा प्रघात आहे. शंभर वर्षातील महत्वपूर्ण इतिहास, घटना, व्यक्ती, उणिवा आदींचा आढावा घेऊन भविष्याची वाटचाल निश्चित करण्याचा व पुसट झालेल्या स्मृतिंना उजळून काढण्याचा हा काळ म्हणता येईल. या पार्श्वभूमिवर ही संधी आपणास मिळाली आहे. वणी नगर परिषदेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात एकूण ३५ ते ३७ नगराध्यक्ष झालेत. त्यातील दहा महिला आहेत. मात्र केवळ तिन शिक्षकांना या शहराचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभले. योगायोगाने त्या तिनही महिलाच आहेत. त्यातील प्रथम नाव शालिनीताई रासेकर, दुसरे साधनाताई गोहोकार व तिसऱ्या आपण स्वतः (विद्याताई आत्राम) आहात. महत्वाचे म्हणजे तत्कालिन शासन निर्णयामूळे यापूर्वीच्या सर्वच महिला नगराध्यक्षांच्या वाट्याला एक ते अडिच वर्षांचा कार्यकाळ आला. त्याला आपण मात्र अपवाद ठरलात. संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ आपल्या कारकिर्दीसाठी सज्ज आहे. त्यामूळे आपणास शतकपूर्तीच्या नगर परिषदेतून वणीकरांसमोर एक ठसठशीत मानदंड प्रस्थापित करण्याची संधी मिळाली आहे.
मा. महोदया, वणी नगर परिषद व वणी शहराला अत्यंत वैभवशाली इतिहास आहे. १८६४ ते १९०५ या इंग्रज राजवटीत वणी जिल्हा होता. याच काळात चौकोनी सुबक रस्त्यांच्या वणी शहराची रचना आकाराला आली. इंग्रज राजवटीपुर्वी सुद्धा वणी शहराला जिल्ह्याचाच दर्जा होता. एकूणच काय तर हे शहर पूर्वी पासूनच अत्यंत महत्वाचे राहिले आहे. बेरार (व-हाड) मध्य प्रांत शासनाच्या नोटिफीकेशन क्र.सी.पी. १५८-१४४५-८ आॅफ दि. १६ जानेवारी १९२४ अन्वये वणीत नगर परिषदेची स्थापना झाली. त्याची पहिली निवडणूक १९२५ मध्ये होऊन दि.२९ जून १९२५ रोजी कै. आबाजी भेदी पहिले नगराध्यक्ष झाले. त्यानंतर आजतागायत अनेक दिग्गजांनी या शहराचे पालकत्व स्विकारुन शहराचा मान सतत उंचावतच ठेवला. अनेक नगराध्यक्ष स्वातंत्र्य संग्रामाचे शिपाई ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची छाप उमटवणाऱ्या, वणीचे सुपूत्र असलेल्या लोकनायक बापूजी अणे यांचे वणी नगर परिषदेच्या जडणघडणीत मोठे योगदान होते. १९३३ पासून तर जणू संपूर्ण नगर परिषदच स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाली होती. १९५२ ते १९८० हा काळ तर वणी शहर व नगर परिषदेसाठी सुवर्ण काळच ठरला. वणी शहरातील एकमेव लोकनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. बाबुरावजी देशपांडे यांनी या शहराचे अबाधित नेतृत्व केले. त्यांनी वणीकरांना जणू तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले. आजही जुनेजाणते वणीकर त्यांचा कार्यकाळ विसरले नाहीत. त्यांच्या निधनानंतर वणी शहराची धुरा श्री. विजयराव मुकेवार यांच्याकडे गेली. बाबुरावजींचा उत्तराधिकारी म्हणूनच त्यांची प्रतिमा बनली होती. त्यावेळी पालिकेचे सभागृह वकिल, प्राध्यापक, डॉक्टर यांच्यासह उच्चविद्याविभूषितांनी भरले होते. त्यावेळची एक सर्वसाधारण सभा ऐतिहासिक ठरली होती. दुपारी बारा वाजता सुरु झालेली सभा चक्क दुसऱ्या दिवशी दिवस उजाडल्यानंतरच पूर्णत्वास गेली होती. पालिका सभागृह शहरासाठी वचनबद्ध असल्याचा तो काळ होता. वणी शहर व नगर परिषदेला प्रतिष्ठा मिळवून देणारा तो काळ होता. त्यानंतर मात्र वणी शहर व नगर परिषदेच्या प्रतिष्ठेची पडझड होणे सुरु झाले ते अद्यापही सुरुच आहे. त्यातून वणी पालिकेला बाहेर काढण्याची आस या शतकपूर्ती नगर परिषदेसह संपूर्ण वणीकरांना आहे. मा. महोदया, वणी शहराला मोठा वारसा आहे. सर्वार्थाने ही पुण्यभूमि आहे. इथली माणसे अत्यंत मोठी आणि कर्तबगार होती. भविष्याचा वेध घेत त्यांनी शहराचे नियोजन अगदी निरपेक्षपणे केले. नगराध्यक्ष हे निव्वळ एक पद नसून शहराचा प्रथम नागरिक या नात्याने ती एक जबाबदारी आहे. ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून झळकत होती. “आपले शहर”… ही भावना त्यामागे होती. भविष्याचा वेध घेण्याची तळमळ त्यांच्या ठायी होती. नगर परिषदेची धुरा आपल्या हाती आल्याने आपणही आता त्याच मांदीयाळित आहात. शिवाय आपण जो राजकीय आणि सांस्कृतिक वारसा घेऊन या मायबाप संस्थेत पाऊल ठेवले तो वारसा शहराची अस्मिता उचावणाराच असेल….(?) पण ही आशा फोल ठरणार नाही हा विश्वास कोलमडून पडतो की काय असे वाटू लागले आहे. वणीकरांची मायबाप संस्था असलेली नगर परिषद केवळ एक दगडी इमारत नाही तर शहराच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी वास्तू आहे. आपल्या शतकपूर्तीच्या कार्यकाळाचे प्रतिबिंब पाहण्याची तिला आस आहे. त्यासाठी सर्व वैभवशाली स्मृती जिवतं करण्यासाठी ही वास्तू आपणाकडे नजर लावून आहे. आपल्या भविष्याकडे तिच्या नजरा लागल्या आहेत. योगायोगाने याच काळात हा ‘दर्पण’ आपल्या हातात आला आहे. शहराच्या मायबाप संस्थेचे पालकत्व स्विकारताना त्याचा उपयोग करायचा की नाही हे सर्वस्वी आपल्या विवेक बुद्धीवर सोडणे अपरिहार्य आहे. एक सजग वणीकर आणि शहराच्या अस्मितेची तळमळ म्हणून नाईलाजाने हा जाहीर पत्रप्रपंच होय. किमान त्याची दखल घेवून हे विषय गांभीर्याने हाताळल्या जातील या भाबड्या आशेसह…
दि.६ आक्टोबर २०२६ मंगळवार
आपला नम्र,श्रीवल्लभ के. सरमोकदम
माजी अध्यक्ष, प्रेस वेलफेअर असो. वणी

























