सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहर भाजप अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांचा कौतुकास्पद उपक्रम; वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीला केली २१ हजारांची मदत…
महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत वणी शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. वाढदिवसावरील अनाठायी खर्च टाळून त्यांनी शेतकऱ्यांच्या व दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला २१,००० रुपयांची देणगी सुपूर्द केली. त्यांच्या या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
७ ऑक्टोबर रोजी ॲड. निलेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी निलेश चौधरी यांच्यासोबत उपस्थित असलेले त्यांचे गुरुवर्य महादेवराव खाडे सर यांनीसुद्धा आपल्या वतीने ११ हजार रुपयांचा धनादेश देत मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक सहाय्य केले.
या वेळी बोलताना ॲड. निलेश चौधरी म्हणाले, “सध्या राज्यात दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी काळात सरकारला आणि जनतेला या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सढळ हाताने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी.”
तसेच, दुष्काळाच्या या कठीण काळात भारतीय जनता पार्टी वणी शहर, वणी विधानसभा आणि आपले नेते माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा संकल्प त्यांनी सोडला. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडून ते तातडीने सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी दिला.

























