सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
दीपावलीच्या पर्वावर घराकडे परतणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांची खाजगी बस चालकांकडून केली जाणारी आर्थिक पिळवणूक त्वरित थांबवावी, याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने थेट प्रादेशिक परिवहन विभागाकडे (RTO) धाव घेतली आहे. या मनमानी भाडेवाढीला आळा न घातल्यास तीव्र जनआंदोलन छेडू, असा निर्वाणीचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी दिला आहे.
तिकिटांचे दर तिपटीने फुगवले…पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथून यवतमाळ व वणी भागात सणासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या हतबलतेचा खाजगी वाहतूकदारांनी गैरफायदा उठवला आहे. एरवी अवघ्या ८०० ते १००० रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी आता कोणतीही तमा न बाळगता २५०० ते ३५०० रुपयांहून अधिक रक्कम उकळली जात आहे. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सुरू असलेल्या या अवाजवी दरांमुळे नागरिकांमधून प्रचंड चीड व्यक्त होत आहे.
आरटीओकडे केलेल्या प्रमुख मागण्या:
भरारी पथकांची नेमणूक: यवतमाळ आणि वणी परिसरातील प्रमुख मार्ग व थांब्यांवर संशयित वाहनांची झाडाझडती घेण्यासाठी आरटीओने विशेष तपासणी पथके सज्ज करावीत.
कार्यालयांवर धाडी: तिकीट विक्री केंद्रे आणि बस थांब्यांवर थेट छापे घालून अतिरिक्त भाडे उकळणाऱ्या चालकांवर जबर दंडात्मक बडगा उगरावा.
अधिकृत भाडेफलक अनिवार्य: प्रत्येक बुकिंग काऊंटर व गाडीवर नियमानुसार मंजूर केलेले भाडेपत्रक प्रवाशांना सहज दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक करावे.
परवाने रद्द करण्याची कारवाई: वारंवार शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या मुजोर बसमालकांचे परमीट तत्काळ रद्द करावे.
रस्त्यावर उतरण्याचा इशारा…प्रशासनाने प्रवाशांच्या होणाऱ्या या लुटीकडे दुर्लक्ष केल्यास मनसे कार्यकर्ते मैदानात उतरून खाजगी चालकांची मनमानी हाणून पाडतील. सणासुदीच्या दिवसांत जनतेला वेठीस धरणाऱ्यांवर कठोर पावले न उचलल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला केवळ परिवहन विभागच जबाबदार असेल, असे मनसेने दिलेल्या निवेदनात ठामपणे नमूद केले आहे.

























