सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहराला जोडणारा अतिशय महत्त्वाचा आणि रहदारीचा समजला जाणारा निळापूर-ब्राह्मणी रस्ता सध्या वाहनधारकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. गेल्या काही दिवसांत येथे सलग दोन वाहने उलटल्याच्या घटना ताज्या असतानाच, अपघातांची ही मालिका अशीच सुरू राहिली तर येत्या काळात एखाद्या निरपराध नागरिकाचा बळी जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. तरीही नगरसेवक, पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता अर्धवट अवस्थेत पडून आहे. अर्धा रस्ता सिमेंटचा करून कंत्राटदाराने उर्वरित अर्धा रस्ता खड्डे आणि उघड्या गिट्ट्यांच्या हवाली सोडून दिला. उघड्या गिट्ट्यांवरून वाहने घसरणे, खड्डे चुकवताना गाड्या अनियंत्रित होणे यामुळे आज पाण्याचा टँकर तर काल सेंट्रिंग भरलेला ट्रॅक्टर उलटला. या मार्गावर शाळा, रुग्णालये आणि मोठ्या वसाहती असल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे.
निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस, नंतर तोंडावर बोट!
“निवडणुका आल्या की सर्वच पक्षांचे नेते आणि संभाव्य नगरसेवक गल्लोगल्ली हात जोडून येतात; रस्ता तातडीने चकाचक करून देण्याची मोठी आश्वासने देतात. मात्र, निवडणुका संपताच ही आश्वासने हवेत विरून जातात आणि लोकप्रतिनिधी या मार्गाकडे ढुंकूनही पाहत नाहीत,” असा घणाघाती आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याच रस्त्यावरून अनेक नेते व अधिकाऱ्यांची वाहने नियमित धावतात; तरीही वस्तुस्थिती माहीत असून नेते तोंडावर बोट ठेवून गप्प का बसले आहेत? पालिका प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
मोठ्या बलिदानाची वाट प्रशासन पाहतंय का?
खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मणक्याचे आजार जडले असून वाहनांची मोडतोड होऊन नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. निवेदने आणि आंदोलने करूनही सुस्त प्रशासन जागे होत नसल्याने लोकांचा संयम आता सुटत चालला आहे. “प्रशासन एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल विचारत, जर तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

























