सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना एका खोलीत डांबून चक्क मद्यपान करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना वणी शहरात उघडकीस आली आहे. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी सध्याच्या काळात शाळा-कॉलेजच्या मुलांवर मित्रांचा वाढता दबाव, चुकीची संगत आणि पालकांचे नकळत होणारे दुर्लक्ष यावर ही घटना प्रकाश टाकणारी ठरली आहे.
नेमकं काय घडलं?
रंगनाथ नगर भागात राहणारी १६ वर्षांची विद्यार्थिनी २७ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास झेरॉक्सच्या कामासाठी आपल्या मैत्रिणीसह निघाली होती. ज्या दुकानात त्या गेल्या, ते बंद असल्याने त्या दोघी इतरत्र वळल्या. तेवढ्यात मैत्रिणीला तिच्या नातेवाईक असलेल्या तरुणीचा फोन आला आणि तिने दोघींनाही “मोमोज खायला जाऊ” असे सांगत बाहेर बोलवून घेतले.
मात्र, त्यांना थेट हॉटेलात नेण्याऐवजी एका भाड्याच्या खोलीवर नेण्यात आले. तिथे पोहोचताच त्या तरुणीचा प्रियकर आणि त्याचा मित्र दारू व बिअरच्या बाटल्या घेऊन आत शिरले. त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना दारू पिण्यासाठी जबरदस्ती केली. मुलींनी सुरुवातीला नकार देताच, “आम्ही तुमच्यावर पैसे खर्च केले आहेत, एवढी तरी प्यावीच लागेल” असा भावनिक आणि मानसिक दबाव त्यांच्यावर टाकला गेला.
दबावाला बळी पडून मुलींनी मद्य घेतल्यानंतर, पुन्हा एका विद्यार्थिनीच्या नकळत तिच्या ग्लासमध्ये बिअर मिसळली गेली. मद्याच्या अमलामुळे त्या मुलीची दृष्टी धूसर झाली आणि तिला भोवतालचे भान उरले नाही. नंतर सावरल्यानंतर दिलेल्या जबाबात, आपल्यासोबत कोणतेही शारीरिक अत्याचार वा गैरकृत्य झाले नसल्याचे मुलीने स्पष्ट केले असून कोणावरही कारवाई नको असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.
पालकांनो सावधान: ‘मोकळा संवाद’ आणि ‘स्पष्ट नकार’ हीच आजच्या काळाची गरज!

























