सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
सोशल मीडियावरून निर्माण झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे शारीरिक संबंधात झाले, मात्र हेच नाते एका महिलेसाठी आता मानसिक आणि कायदेशीर पेच ठरले आहे. संबंध तोडल्याच्या रागातून महिलेला धमकावणाऱ्या आणि मानसिक छळ करणाऱ्या पुसद येथील तरुणाला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ओळख, प्रेम आणि शारीरिक संबंध…
मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथील ३६ वर्षीय विवाहित महिलेची इंस्टाग्राम चॅटिंगच्या माध्यमातून पुसद येथील तुषार गजानन काकडे (वय २७) याच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला साध्या असलेल्या या संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. १५ ऑक्टोबर २०२४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. वणी, नागपूर, भोपाळ आणि पुणे अशा विविध ठिकाणी या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
नातं तोडण्याचा निर्णय आणि धमक्यांचे सत्र..
काही काळानंतर महिलेने तुषारला सांगितले की, “मला आता हे संबंध पुढे वाढवायचे नाहीत, त्यामुळे आपण आपले मार्ग वेगळे करूया.” मात्र, हा निर्णय तुषारला मान्य नव्हता.तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला परंतु त्याने वेगवेगळ्या नंबरवरून मैसेज पाठवत महिलेला त्यांच्या खाजगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, “मी सर्व चॅटिंग तुझ्या पतीला पाठवेन” आणि “मी आत्महत्या करून तुझे नाव त्यामध्ये गुंतवीन” अशी भीतीदायक धमकी देऊन त्याने महिलेचा मानसिक छळ सुरू केला.
पोलीस कारवाई आणि अटक…
या सततच्या त्रासामुळे संबंधित महिलेने २७ एप्रिल २०२६ रोजी वणी पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार नोंदवली. वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई केली. रात्री ३ वाजता पोलीस पथक रवाना झाले आणि सकाळी १० वाजता आरोपी तुषार काकडे याला वणीमध्ये हजर करून अटक करण्यात आली. आरोपीला सध्या तुरुंगात ठेवण्यात आले असून, पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडी (MCR) मिळवण्यासाठी कोर्टाकडे मागणी केली आहे.
गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल…
वणी पोलिसांनी या प्रकरणी अपराध क्रमांक ३२०/२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ३५१(१), ३५१(२), ३५१(३) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (Atrocities Act) कलम ३८१ w(i), ३८१ w(ii), ३८२ (va), ३८२(v), ३(२)(va) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी सुरेश दळवे व त्यांचे पथक करीत आहे.
सावधानता: सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या नात्यांचा हा धोकादायक पैलू पुन्हा एकदा समोर आला आहे. आभासी जगातील जवळीक किती महाग पडू शकते, याचे हे उदाहरण असून खाजगी माहिती शेअर करताना महिलांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

























