सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरातील मुख्य भाजी मंडई परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि ३१ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे जुगार चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजी मंडईच्या गजबजलेल्या भागात खुलेआम मटक्याचा खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संबंधित अड्ड्यावर अचानक छापा घातला. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी घटनास्थळावरून सैय्यद जाफर ऊर्फ बबलू सैय्यद नन्नू आणि शेख फारुख शेख फरीद या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. झडतीत त्यांच्याकडे मटका जुगाराच्या चिठ्ठ्या, नोंदींचे साहित्य आणि ३१ हजार रुपयांची रोकड आढळून आल्याने पोलिसांनी सर्व ऐवज जागेवरच जप्त केला.
या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
सदर मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या थेट सूचनांनुसार राबवण्यात आली. या कारवाईत प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, किशोर आडे आणि सलीम शेख यांनी सहभाग घेतला.
शहरात बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्या समाजकंटकांवर या कारवाईमुळे चांगलाच वचक निर्माण झाला असून, अवैध मटका आणि जुगार समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस दल पुढे अशीच धडक मोहीम सुरू ठेवणार का, याकडे आता सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

























