वणीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या पक्षबांधणीला जोरदार वेग आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चोरडिया यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
अलीकडेच विजय चोरडिया यांना यवतमाळ, राळेगाव आणि वणी क्षेत्रासाठी शिवसेना संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जबाबदारी मिळताच त्यांनी माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षविस्ताराची गती वाढवली आहे. समाजाच्या विविध घटकांतील कार्यकर्त्यांना जोडून पक्ष संघटनेला बळकटी दिली जात आहे.
पूर्वीपासून समाजसेवेचा वारसा असलेल्या विजय चोरडिया यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा आणि सामान्य जनतेचा मोठा विश्वास निर्माण झाला आहे. माजी आमदार नांदेकर यांच्या नेतृत्वात आणि चोरडिया यांच्या सक्रियतेमुळे शिवसेना शिंदे गटाला ग्रामीण भागात नवे बळ मिळत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, “विश्वास नांदेकर आणि विजय चोरडिया हे दोघे मिळून संघटनेला नवे रूप देत आहेत. त्यांचा जनाधार आणि कार्यपद्धती पाहता आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटासाठी हे समीकरण अत्यंत फायद्याचे ठरणार आहे,” असे मत व्यक्त होत आहे.
वणी परिसरात सध्या शिवसेना शिंदे गटाचे वारे जोरात वाहू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. नांदेकर आणि चोरडिया यांचे नेतृत्व येणाऱ्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

























