सिटी हब मिडिया वणी…
भाजपाला मोठा धक्का; जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांचा गंभीर आरोपांसह राजीनामा…
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी आज श्री विनायक मंगल कार्यालय, वणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षावर गंभीर आरोप करत भाजपला रामराम केल्याची घोषणा केली.
कुणाल चोरडिया म्हणाले,“वरिष्ठ नेतृत्वाने माझ्याकडे कायम दुर्लक्ष केले. वणीतील स्थानिक नेतृत्वाने मला कधीच महत्व दिले नाही. मला वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे भाजपमध्ये राहणे असहनीय झाले.”
वडिलांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर बदललेली परिस्थिती…
काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील विजय चोरडिया, जे भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य होते, त्यांनी भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
या घटनेनंतरच पक्षात त्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले, तसेच “कुणालदेखील शिवसेनेत जाणार” अशा अफवा पसरवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले –“मी वडिलांच्या निर्णयाविरोधात जाऊन भाजपमध्ये निष्ठेने राहिलो. पण त्यांच्या प्रवेशानंतर माझ्यावर दडपण आणले गेले आणि माझ्याबाबत चुकीची माहिती पसरवली गेली.”
जबाबदारी न दिल्याची नाराजी
नगरपालिका निवडणुकीच्या तयारीत त्यांना कोणतीच जबाबदारी देण्यात आली नाही, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“जिल्हा उपाध्यक्ष पद असूनही मला कोणताही प्रभाग देण्यात आला नाही. मी वरिष्ठांकडे तक्रार केली पण कुणीच दखल घेतली नाही. जिल्हाध्यक्ष वणीला आले, पण मला बैठकीला देखील बोलावले नाही,” असे त्यांनी सांगितले.
‘भाजप आता वरिष्ठांचा पक्ष’ — तीव्र आरोप
कुणाल चोरडिया म्हणाले “भारतीय जनता पार्टी आता कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही. हा पक्ष काही मोजक्या वरिष्ठांच्या हातात केंद्रित झाला आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात नाही.”
उबाठाची मशाल किंवा धनुष्यबाण — सर्व पर्याय खुले
भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले –“माझ्यासाठी पुढील राजकीय वाटचालीसाठी सर्व पर्याय खुले आहेत. मी उबाठाची मशाल हाती घेऊ शकतो किंवा शिवसेनेचे धनुष्यबाण हातात उचलू शकतो. पण कोणताही निर्णय मी एकट्याने घेणार नाही.”ते पुढे म्हणाले –
“पुढील राजकीय निर्णय मी माझे वडील विजय चोरडिया यांच्याशी चर्चा करूनच घेणार आहे.”
नगराध्यक्ष पदासाठी दाब असताना देखील पक्षनिष्ठा कायम ठेवली — दावा
कुणाल चोरडिया यांनी सांगितले –
“आरक्षण वेगळं असतं, तर मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतो, असे आमदार संजय दरेकर यांनीही सांगितले होते. पण मी नेहमीच भाजपचा सच्चा कार्यकर्ता राहिलो.”
शेवटी घेतलेला ‘भाजपला रामराम’ निर्णय
“दुर्लक्ष, अपमानास्पद वागणूक आणि मान-सन्मान न दिल्यामुळे अखेर मी भाजपला रामराम करत पक्षाचा राजीनामा देत आहे,” असे म्हणून कुणाल चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली.

























