सिटी हब मिडिया वणी…
वणी येथील प्रसिद्ध पत्रकार रवी ढुमणे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे वणी शहरासह संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
रवी ढुमणे हे अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय होते. विशेषतः क्राईम बीटमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. विविध गंभीर गुन्हे, पोलिस कारवाई, सामाजिक प्रश्न यावर त्यांनी निर्भीड व अभ्यासपूर्ण वृत्तांकन केले होते. त्यांनी अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये काम करून एक संवेदनशील व विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळख निर्माण केली होती. मात्र मागील काही वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रापासून काही प्रमाणात दूर झाले होते.
विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. आज सकाळी ते आपल्या खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. चहा देण्यासाठी घरातील सदस्य खोलीत गेले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब तत्काळ संबंधित यंत्रणांना कळवण्यात आली.
घटनेनंतर रवी ढुमणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
रवी ढुमणे यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक अनुभवी व कर्तव्यनिष्ठ पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने मित्रपरिवार, सहकारी पत्रकार तसेच परिचितांमध्ये तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.
सिटी हब मिडिया तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…

























