सिटी हब मिडिया वणी…
नवीन वर्षाची सुरुवात अध्यात्माने; वणीत श्रीमद् भागवत कथा महोत्सवाचे भव्य आयोजन…
नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात अध्यात्मिक वातावरणात व्हावी, या हेतूने वणी शहरात भव्य श्रीमद् भागवत कथा सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध भागवताचार्य पंडित मनु महाराज तुगनायत यांच्या मधुर व भावपूर्ण संगीतमय कथावाचनाने हा आध्यात्मिक सोहळा अधिकच भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
हा सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा महोत्सव रविवार ४ जानेवारी २०२६ ते रविवार ११ जानेवारी २०२६ दरम्यान श्री जैताई मंदिर, वणी येथे वेळ (दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत) संपन्न होणार आहे. या काळात भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे, भक्तीमार्गाचे व जीवनमूल्यांचे सुंदर विवेचन कथारूपाने मांडले जाणार आहे.
कथेच्या प्रारंभी श्री विनायक स्थापना व ग्रंथ पूजन होणार असून, श्रीमद् भागवत महात्म्य, बालक ध्रुव व प्रल्हाद चरित्र, गजेंद्र मोक्ष, समुद्रमंथन, वामन अवतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव, कंसवध, रुक्मिणी विवाह, सुदामा भेट, राजा परीक्षित मोक्ष आदी प्रसंगांचे सविस्तर कथन होणार आहे.
दररोज सकाळी विविध धार्मिक विधी, तसेच कथाविचारानुसार धार्मिक झांकी व भक्तिगीतांवर आधारित नृत्यप्रस्तुतीही सादर केली जाणार आहे. रविवार ११ जानेवारी रोजी होमहवन व महाप्रसादाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होणार आहे. 
या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री भागवत सेवा समिती, वणी यांच्या वतीने करण्यात आले असून, सर्व भाविक भक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

























