सिटी हब मिडिया वणी…
आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून वणी येथील शासकीय विश्रामगृहात जागृत पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजू धावंजेवार उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी आजच्या काळातील पत्रकारितेतील बदलते स्वरूप आणि वाढती आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, आज पत्रकारिता करणे अत्यंत कठीण झाले असून अनेकदा जीव धोक्यात घालून पत्रकारांना काम करावे लागते. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात न्यूज पोर्टल्स निर्माण झाली असली, तरीही वृत्तपत्रांचे महत्त्व आजही अबाधित आहे. कारण वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वी तिची सत्यता तपासली जाते व योग्य पडताळणीनंतरच ती वाचकांपर्यंत पोहोचते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेतील बदल, पत्रकारांची सामाजिक जबाबदारी तसेच नैतिक मूल्यांचे महत्त्व यावरही चर्चा करण्यात आली. पत्रकार दिनाचे औचित्य साधून जागृत पत्रकार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार तथा जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धावंजेवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास जागृत पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप बेसरकर, सचिव मोहम्मद मुस्ताक यांच्यासह पुरुषोत्तम नवघरे, आकाश दुबे, प्रशांत चंदनखेडे, विवेक तोटेवार आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























