सिटी हब मिडिया वणी…
आंबेडकर चौक, वणी येथील नवशक्ती दुर्गा मंडळ संचालित श्री दुर्गा माता मंदिरात शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी दुर्गा माता प्राणप्रतिष्ठा दिन महोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची स्थापना १० जानेवारी १९९८ रोजी करण्यात आली असून, मंदिराचे ७ ऑक्टोबर २०२१ रोजी नुतनीकरण व जीर्णोद्धार करण्यात आले होते.
नुतनीकरणानंतर दरवर्षी नवरात्रोत्सवात देशातील विविध जागृत देवीस्थळांहून – माहूर, तुळजापूर, कुरुक्षेत्र आदी ठिकाणांवरून अखंड ज्योत आणण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. या काळात हजारो भाविक दुर्गा मातेच्या दर्शनासाठी मंदिरात उपस्थित राहतात.
मंदिरालगतच अतिप्राचीन हनुमान मंदिर तसेच विठ्ठल-रुक्माई मंदिर असल्याने वर्षभर या परिसरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यामुळे हा परिसर भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरला आहे.
उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा दिन महोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता श्री दुर्गा माता अभिषेक, सकाळी १० वाजता दुर्गा माता सप्तशती पाठ, दुपारी १२.३० वाजता महाआरती तसेच दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून दुर्गा मातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन नवशक्ती दुर्गा मंडळ, आंबेडकर चौक, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

























