सिटी हब मिडिया वणी…
तंबाखू तस्करी प्रकरणात ठोस कारवाईची मागणी; २६ जानेवारीला धरणे आंदोलनाचा इशारा वणीतील तंबाखू तस्करी प्रकरणात कारवाई रखडली; अजिंक्य शेंडे यांचे पोलीस अधीक्षकांना कडक स्मरणपत्र…
वणी शहरात उघड झालेल्या सुगंधी तंबाखू तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन जवळपास महिना पूर्ण होत असतानाही आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आरोपींची अटक तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना उपजिल्हा प्रमुख (यवतमाळ) अजिंक्य सुभाष शेंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना अंतिम स्मरणपत्र सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भात लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांनी जा.क्र. ४४/२०२६ (दि. १४ जानेवारी २०२६) अन्वये चौकशी अहवाल सादर केला असून वणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. मात्र, एवढी प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
आरोपी खुलेआम फिरत असल्याचा आरोप…
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तक्रारीतील आरोपी ८ डिसेंबर २०२५ पासून समाजात मोकाटपणे फिरत आहेत. अद्याप कोणालाही अटक न होणे ही बाब गंभीर असून पोलिसांच्या निष्क्रियतेकडे निर्देश करणारी असल्याचे शेंडे यांनी म्हटले आहे.
वाहन जप्ती अजूनही प्रलंबित…
तंबाखू तस्करीसाठी वापरण्यात आलेले MH-24-BL-7051 क्रमांकाचे वाहन अजूनही जप्त करण्यात आलेले नाही. गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेल्या वाहनावरही कारवाई होत नसल्याने तपासावर संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तपासात दिरंगाईचा ठपका…
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अहवालात तपास सुरू असल्याचा उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपासात जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
आंदोलनाचा स्पष्ट इशारा…
या स्मरणपत्राद्वारे प्रशासनाला ७ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आरोपींना अटक, वाहन जप्ती व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता वणी तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही शेंडे यांनी नमूद केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत…
या निवेदनाची प्रत वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजयजी देरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती विभाग), जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार वणी, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तसेच वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना देण्यात आली आहे.
तंबाखू तस्करीसारख्या गंभीर प्रकरणात होत असलेल्या दिरंगाईमुळे प्रशासनावर दबाव वाढत असून, आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























