सिटी हब मिडिया वणी…
किरण नांदेकर यांचे सक्रिय राजकारणात पदार्पण; विश्वास नांदेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे संकेत…
माजी आमदार स्वर्गीय विश्वास नांदेकर यांच्या पत्नी किरण नांदेकर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मागील काही दिवसांपासून विश्वास नांदेकर यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी किरण नांदेकर स्वीकारणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, याबाबत त्यांनी आजपर्यंत कोणतीही सार्वजनिक घोषणा केलेली नव्हती किंवा कुठल्याही मंचावर यावर भाष्य केले नव्हते.
आज, २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त किरण नांदेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. याच वेळी त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात उतरण्याची घोषणा करत राजकीय प्रवासाला प्रारंभ केल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना किरण नांदेकर म्हणाल्या की, “स्वर्गीय विश्वास भाऊ नांदेकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक होते. शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. या विधानसभा क्षेत्रात तसेच ग्रामीण व शहरी भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.”
त्या पुढे म्हणाल्या की, “जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांनी राजकारणात सक्रिय होण्यास सांगितले, तर मी निश्चितपणे ती जबाबदारी स्वीकारेन.” तसेच आपल्या पाठीशी शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे भक्कम बळ असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण तसेच शहरी भागातील शिवसेना कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचे सांगत, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचेही किरण नांदेकर यांनी स्पष्ट केले.
एकूणच, स्वर्गीय विश्वास नांदेकर यांचा राजकीय वारसा पुढे नेत किरण ताई नांदेकर आता सक्रिय राजकारणात ठसा उमटवताना दिसणार असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

























