सिटी हब मिडिया वणी…
गुटखा तस्करीविरोधात युवासेनेचा एल्गार पोलीस प्रशासनाला आमदार संजय देरकरांचा ८ दिवसांचा कडक इशारा…
वणी शहर व परिसरात सुरू असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर व्यवसायावर पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत, युवासेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी वणी पोलीस ठाण्यासमोर आक्रमक धरणे आंदोलन करण्यात आले. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
राज्य शासनाने कायद्याने बंदी घातलेले गुटखा व सुगंधित तंबाखू वणी शहरात सर्रास विकले जात असतानाही पोलीस प्रशासन केवळ दिखाऊ कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. काही प्रकरणांमध्ये बनावट पंचनामे करून तस्करांना अभय दिले जात असल्याचेही आंदोलनादरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले. पंचशील नगर परिसरात करण्यात आलेल्या कथित बनावट कारवाईतील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी आमदार देरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आठ दिवसांच्या आत गुटखा तस्करीसह सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा युवासेनेच्या वतीने याहून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा त्यांनी दिला.
पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी व तोंडी स्वरूपात आवश्यक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिली.

























