सिटी हब मिडिया वणी…
शिरपूर पोलिसांची मोठी कामगिरी : एमडीसह तरुण ताब्यात, ९.८२ लाखांचा ऐवज जप्त…
जिल्ह्यात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यवहारावर लगाम घालण्यासाठी शिरपूर पोलिसांनी राबवलेल्या नियोजनबद्ध कारवाईत एक मोठा ड्रग्स पुरवठादार जाळ्यात अडकला आहे. एमडी (मेफेड्रोन) या घातक सिंथेटिक अमली पदार्थासह एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ९ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक पातळीवरील ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी कारवाई मानली जात आहे.

अमली पदार्थांविरोधात कडक पावले उचलण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी दिल्यानंतर शिरपूर पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. दरम्यान, पुनवट (ता. वणी) येथील रहिवासी व सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेला श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील हा वणी-शिरपूर भागात एमडी विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा करून चारगाव–वणी मार्गावर सापळा रचण्यात आला. सायंकाळच्या सुमारास चारगावकडून येणारी DATSUN GO+ (MH 32 AH 4126) ही कार अडवून तपासण्यात आली. तपासणीदरम्यान आरोपीकडे सुमारे ५७.१ ग्रॅम एमडी आढळून आली, ज्याची अंदाजे बाजारमूल्य ५ लाख ६० हजार रुपये आहे. तत्काळ अमली पदार्थ जप्त करून संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
याशिवाय, ड्रग्स व्यवहारासाठी वापरले जाणारे तीन इलेक्ट्रॉनिक वजन काटे (१५ हजार रुपये), एक मोबाईल फोन (७० हजार रुपये) आणि संबंधित चारचाकी वाहन (४ लाख रुपये) असा एकूण ९.८२ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या अमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी आरोपीविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली असून, या मागे असलेल्या मोठ्या साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनेवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
अमली पदार्थांविषयी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

























