- सिटी हब मिडिया वणी…
लोकप्रतिनिधीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा काय करू शकतो, याचा प्रत्यय वणी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडलेल्या अंडरग्राऊंड नाल्यांच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून, नगरसेविका सौ. प्रमिला मनोज चौधरी यांच्या पुढाकाराने हे काम पुन्हा युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

नेमकी समस्या काय होती?
प्रभाग ८ मध्ये अंडरग्राऊंड नाल्यांचे खोदकाम करून काम अर्ध्यावरच सोडून देण्यात आले होते. यामुळे पावसाळी पाणी साचणे, डबकी तयार होणे आणि चिखलामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. आरोग्याचा प्रश्न आणि अपघाताची टांगती तलवार यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.

असा झाला कामाचा मार्ग मोकळा
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी थेट नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम यांच्याकडे धाव घेतली. केवळ निवेदन न देता, प्रभागातील वस्तुस्थिती आक्रमकपणे मांडली. प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली आणि थांबलेली यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली आहे.
‘विकासाच्या बाबतीत तडजोड नाही’
“जनतेने विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडताना मूलभूत सुविधांना माझे पहिले प्राधान्य आहे. अर्धवट कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला, मात्र आता ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेणार,” असा विश्वास प्रमिला चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

























