सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
श्रद्धा, भक्ती आणि अलौकिक इतिहासाचा वारसा लाभलेल्या वणी शहरातील श्री मारोती संस्थान (अमृत भवन, हमीद चौक) येथे यावर्षी देखील हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. साक्षात पवनपुत्राच्या दृष्टांतातून या मंदिराची स्थापना झाली असून, वणीच्या आध्यात्मिक वैभवात या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. या मंदिरातूनच वणीतील हनुमान जन्मोत्सवाची सुरूवात झाली असे सांगितल्या जाते…
मंदिराचा चमत्कारिक इतिहास…
या मंदिराचा इतिहास अत्यंत विलोभनीय आहे. जशोदा फॅक्टरीचे तत्कालीन मॅनेजर हरदासभाई अंदाणी यांना प्रत्यक्ष हनुमानजींनी स्वप्नात दर्शन देऊन सांगितले होते की, “मी या ठिकाणी जमिनीत दबलेला आहे, मला बाहेर काढा.”
या दृष्टांतानुसार अंदाणी यांनी संबंधित ठिकाणी खोदकाम केले असता, तिथे हनुमानाची भव्य स्वयंभू मूर्ती सापडली. विशेष म्हणजे, या खोदकामादरम्यान केवळ हनुमानजीच नव्हे, तर भगवान व्यंकटेश्वराची दुर्लभ मूर्ती, विष्णू अवतार वराहची मूर्ती, मोठे शिवलिंग आणि भव्य नंदी अशा अनेक प्राचीन व दुर्मिळ मूर्ती प्राप्त झाल्या. या सर्व मूर्तींची याच ठिकाणी प्रतिष्ठापना करून जशोदा फॅक्टरीच्या प्रबंधकांनी एका भव्य मंदिराची निर्मिती केली.
५० वर्षांची अविरत सेवा परंपरा…
१९७५ मध्ये हिंदू देवालय समितीमध्ये कार्यरत असलेले कांतीभाई जोबनपुत्रा आणि भवानीशंकरजी पाराशर यांच्याकडे या मंदिराची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हापासून, म्हणजेच मागील ५० वर्षांपासून जोबनपुत्रा परिवार या जागृत देवस्थानची अत्यंत निष्ठेने देखरेख आणि व्यवस्थापन सांभाळत असून, दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाचे नेटके आयोजन करत आहे.
यावर्षीच्या उत्सवाचे स्वरूप:
भव्य कीर्तन सोहळा (बुधवार, १ एप्रिल २०२६):
उत्सवाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी ७:०० वाजता नागपूरचे सुप्रसिद्ध ह.भ.प. श्री. रविंद्र साधूजी महाराज यांचे कीर्तन संपन्न होईल.

मुख्य जन्म सोहळा (गुरुवार, २ एप्रिल २०२६):
गुरुवारी पहाटे ५:०० वाजता महापूजा व अभिषेकाला सुरुवात होईल. सूर्योदयाच्या मंगल समयी प्रभू हनुमानजींचा पाळणा आणि जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडेल.जन्मोत्सावानंतर सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे…
भाविकांना आग्रहाचे निमंत्रण:
साक्षात मारुतीरायाचा पत्ता लागलेल्या या ऐतिहासिक आणि जागृत मंदिरात दर्शनासाठी वणीकरांची मोठी गर्दी असते. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सर्व धर्मप्रेमी भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन समिती व जोबनपुत्रा परिवारातर्फे करण्यात आले आहे.

























