सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
धावत्या दुचाकीला लाथ मारून तरुणाला खाली पाडत लूटमार करण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला आहे. विशेष म्हणजे, ज्या ३ लाख रुपयांसाठी हा जीवघेणा हल्ला झाला, ती बॅग दरोडेखोरांच्या हाती लागण्याऐवजी रस्त्याशेजारील कचऱ्यात पडल्याने सुदैवाने बचावली आहे.

नेमकी घटना काय?
चोपण येथील रहिवासी चेतन विजय चिंचोळकर (२५) हे सोमवारी रात्री ८.४० च्या सुमारास वणीहून आपल्या गावाकडे परतत होते. त्यांच्याकडे शेती खरेदीसाठी आणलेले ३ लाख रुपये एका बॅगेत होते. मार्डी ते बामर्डा दरम्यानच्या जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी चेतनचा पाठलाग सुरू केला.
असा फसला दरोडेखोरांचा डाव…
हल्ला: दरोडेखोरांनी चेतनच्या चालत्या दुचाकीला जोरात लाथ मारली, ज्यामुळे तो रस्त्यावर कोसळला.
नशीब बलवत्तर…
चेतन खाली पडत असताना त्याच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग उसळून लांबवर असलेल्या झाडपाल्याच्या कचऱ्यात जाऊन पडली. दरोडेखोरांनी चेतनची आणि त्याच्या गाडीची झडती घेतली, मात्र त्यांना काहीच सापडले नाही. दरम्यान, समोरून इतर वाहने येत असल्याचे पाहून पकडले जाण्याच्या भीतीने तिन्ही दरोडेखोर रिकाम्या हाताने पसार झाले.
पोलिसांकडून तपास सुरू…
सुरुवातीला आपली बॅग चोरट्यांनी नेली असावी, असा चेतनचा समज झाला होता. त्याने तातडीने मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, रस्त्याच्या कडेला झाडपाल्यात ती बॅग सुरक्षित रित्या सापडली. बॅगेतील ३ लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
दहशतीचे वातावरण…
या घटनेमुळे वणी, नांदेपेरा आणि वडकी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारेगाव पोलीस सध्या त्या तिन्ही फरार तरुणांचा शोध घेत आहेत.

























