सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी वणी पोलिसांनी आता कंबर कसली असून, गेल्या चार दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून जुगार खेळणाऱ्या चौघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त माहितीवरून सापळा…
वणी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २० आणि २३ एप्रिल रोजी शहरातील वर्दळीच्या भागात विशेष शोधमोहीम राबवली. यामध्ये भाजी मंडी परिसर आणि ब्राह्मणी फाटा येथे लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी अचानक छापा टाकला.
यांच्यावर झाली कारवाई…
या छाप्यात पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत:
अतुल सुधाकर नक्षीने (रा. रंगारीपुरा, वणी)
शेख फारुख शेख सलीम (रा. पंचशील वार्ड, वणी)
अंश सावंत पासवान (रा. पंचशील नगर, वणी)
रेहान मोहम्मद हनीफ शेख (रा. पंचशील नगर, वणी)
जप्त मुद्देमाल: पोलिसांनी या कारवाईत एकूण ४,३९० रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
“शहरातील अवैध धंदे पूर्णपणे मुळासकट उपटून टाकणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील. नागरिकांनी घाबरू नये आणि परिसरात कुठेही असे गैरप्रकार सुरू असल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे.”
— पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी…
अवैध धंदेवाल्यांना इशारा..
वणी पोलीस प्रशासनाकडून सध्या विशेष पथकांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. केवळ जुगारच नव्हे, तर इतर सर्व अवैध व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर आहे. भविष्यात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

























