सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
शहरातील वर्दळीच्या भागात चोरांचा सुळसुळाट वाढला असून, भरदिवसा एका दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भालर येथील रहिवासी अजय भोजराज टोंगे (वय २५) हे २३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या वडिलांसह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वणी शाखेत गेले होते. तेथून त्यांनी एकूण १,५०,००० रुपये रोख काढले. यामध्ये १०० रुपयांच्या १० थप्प्या (एक लाख रुपये) आणि ५०० रुपयांची एक थप्पी (५० हजार रुपये) अशा रकमेचा समावेश होता.
बँकेतून बाहेर पडल्यानंतर अजय यांनी ही सर्व रोकड आपल्या ‘ड्युएट’ मोपेड (क्र. MH 29 AZ 6917) च्या डिक्कीत ठेवली आणि ती नीट लॉक केली. त्यानंतर ते काही घरगुती खरेदीसाठी भारतमता चौक परिसरातील एका धान्य दुकानावर गेले.
चोरांनी साधली संधी…
अजय टोंगे हे खरेदीत व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. साधारणतः सकाळी ११:३० च्या सुमारास चोरांनी मोपेडचे लॉक शिताफीने उघडले आणि डिक्कीत ठेवलेल्या रकमेपैकी १,००,००० रुपये काढून पळ काढला. विशेष म्हणजे, चोरांनी ५० हजार रुपयांची एक थप्पी डिक्कीतच सोडून केवळ लाखाच्या रकमेवर हात साफ केला.
पोलिसांत तक्रार दाखल…
खरेदी करून परत आल्यावर अजय यांना गाडीची डिक्की उघडी दिसली. तपासणी केली असता त्यातील एक लाख रुपये गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.
तपास सुरू: पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
शहराच्या मुख्य चौकात अशा प्रकारे चोरी होत असल्याने व्यापार आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस आता संशयितांचा शोध घेत आहेत.

























