सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक आणि वादग्रस्त ‘भोजशाळा’ ही हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (सरस्वती) मंदिर असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा इंदूर उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शेकडो वर्षांपासून दडपल्या गेलेल्या सत्याचा विजय झाला असून, मंदिरमुक्तीच्या लढ्याला मोठे यश आल्याची भावना हिंदु जनजागृती समितीने व्यक्त केली आहे. समितीने या निर्णयाचे स्वागत करत, आता काशी आणि मथुरेच्या मुक्तीचा संकल्प जाहीर केला आहे.

प्रदीर्घ कायदेशीर आणि सामाजिक संघर्षाला यश…
धार येथील भोजशाळा हे मूळचे हिंदूंचे मंदिर असल्याचे पुराव्यांसह सिद्ध झाले आहे. या संदर्भात दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईवर आता कायद्याची मोहर उमटली आहे. हा लढा यशस्वी करण्यात ‘भोजशाळा मुक्ती आंदोलनाचे’ प्रमुख श्री. नवलकिशोर शर्मा यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे मोठे योगदान राहिले आहे.
समितीने केवळ कायदेशीर स्तरावरच नव्हे, तर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) माध्यमातून या विषयाला राष्ट्रीय पातळीवर नेले. गोव्यात दरवर्षी होणाऱ्या या अधिवेशनात भोजशाळेच्या मुक्तीसाठी ठराव मंजूर करून आंदोलनाची दिशा निश्चित केली जात होती. देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केंद्र आणि मध्यप्रदेश सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर न्याय मिळाला आहे.

‘…आता काशी-मथुरा बाकी आहे!’
या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी सांगितले की:
“परकीय आक्रमकांनी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांनी भारतीय हिंदूंच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेत हजारो मंदिरांवर अतिक्रमणे केली. मात्र, अयोध्या आणि धार (भोजशाळा) येथील न्यायालयीन निकालांनी हे स्पष्ट केले आहे की असत्य फार काळ टिकू शकत नाही. भोजशाळेचा लढा आता यशस्वी झाला असून, यापुढील काळात काशीच्या ज्ञानवापीपासून ते मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंतची सर्व आक्रमित मंदिरे मुक्त करण्यासाठीचा संघर्ष निरंतर सुरू राहील.”
न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांना न्याय मिळाल्याचे सांगत समितीने आगामी काळातील आंदोलनाचा पुनरुच्चार केला आहे.

























