सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजूर आणि चिखलागाव परिसरातील शेकडो भाविक पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रवासाला निघाले आहेत. हातात भगव्या पताका, शिरावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदुंगाचा गजर अशा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

या प्रवासाच्या सुरुवातीलाच प्रवीणभाऊ खानझोडे व लढा संघटनेच्या वतीने सर्व वारकरी बांधवांचा तसेच त्यांना सुरक्षित घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी खानझोडे परिवाराने सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत त्यांचा पंढरपूरचा प्रवास सुखकर व मंगलमय व्हावा, अशी प्रार्थना केली.

“ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण राजूर-चिखलागाव परिसर दुमदुमून गेला होता. वारकरी संप्रदायाची ही समता आणि बंधुभावाची परंपरा आजही समाजाला नवा उत्साह व ऊर्जा देणारी ठरत आहे.”
या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वारकऱ्यांचे स्वागत केले व निरोप दिला. या सोहळ्याला शिवाजी मोरे, आकाश दुबे, श्रीकांत कालर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

























