सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी एमआयडीसी परिसरातील गोदामात परराज्यातून आणलेला तब्बल १५ हजार अवैध दारूच्या बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, या कारवाईत सुमारे १२.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. मध्य प्रदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा साठा वणीपर्यंत पोहोचल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा ‘लढा संघटना वणी विधानसभा’चे प्रवीण खानझोडे यांनी दिला आहे.
स्थानिक यंत्रणा सुस्त, बाहेरील पथकाची कारवाई!
स्थानिक पातळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आणि अधिकारी कार्यरत असताना, अमरावतीच्या विशेष पथकाला (एलसीबी) वणीत येऊन धाड टाकावी लागते, ही बाब संशयास्पद आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने किंवा अर्थपूर्ण व्यवहारांमुळेच हा परराज्यातील अवैध व्यवसाय बिनबोभाट सुरू असल्याचा थेट संशय प्रवीण खानझोडे यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक यंत्रणेचा कामचुकारपणा आणि संशयास्पद भूमिकेमुळे संपूर्ण विभागाची प्रतिमा मलिन झाली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रशासनाला लेखी निवेदन सादर…
या गंभीर प्रकाराची दखल घेत लढा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एसडीओ), वणी यांच्यामार्फत यवतमाळचे जिल्हाधिकारी, मुंबईचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त तसेच यवतमाळ अधीक्षकांना लेखी निवेदन पाठवून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या:
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण रॅकेटची निष्पक्ष व कालबद्ध चौकशी व्हावी.
आर्थिक देवाणघेवाण आणि लाचखोरीचा दाट संशय असल्याने या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) स्वतंत्र चौकशी व्हावी.
वणी उत्पादन शुल्क विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.
वणी तालुक्यातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, बिअर बार आणि गोदामांची तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी.वणीतील
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या संगणमताने परराज्यातील दारूचा अवैद्य व्यवसाय वणी परिसरातील राजरोसपणे सुरू आहेत. या ठिकाणी संबंधित विभाग कार्यरत असताना अमरावती विभागातील एलसीबी पथकाला इथे येऊन धाड टाकून कारवाही करावी लागत आहेत यावरून अशी लक्षात येते की त्यावरून या विभागाचा कर्मचारी काम चुकारपणा दिसून येते किंवा संबंधी विभागाचा त्या लोकांशी आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार असण्याची दाट शक्यता आहे – प्रवीण खानझोडे –लढा संघटना वणी विधानसभा…
केवळ मुद्देमाल जप्त करून कारवाईचा देखावा न करता अवैध दारू रॅकेटचा मुख्य म्होरक्या, गोदाम मालक आणि वाहतूकदारांचा खरा चेहरा समोर आणला पाहिजे. येत्या ८ दिवसांत समाधानकारक चौकशी आणि ठोस कारवाई न झाल्यास राज्य उत्पादन शुल्क वणी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी दिला आहे.

























