सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
सध्याच्या राजकारण आणि समाजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे सोपे नसते. कोणत्याही राजकीय वारशाची पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीवर, कष्टांवर आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रविणभाऊ खानझोडे. वणी विधानसभा मतदारसंघात आज ते केवळ एक नाव राहिले नसून, तरुणाईच्या हक्कांसाठी लढणारा एक विश्वासार्ह सहकारी आणि आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला हा विशेष प्रकाशझोत.
कष्टातून घडलेलं नेतृत्व… प्रविण खानझोडे यांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून सुरू झाला. १७ नोव्हेंबर १९७८ रोजी गौराळा (मारेगाव रोड) येथे जन्मलेल्या प्रविणभाऊंचे बालपण राजूर येथे गेले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वडिलांची नोकरी सुटल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा भार उचलला. सकाळ-संध्याकाळ किराणा दुकानात कष्ट करायचे आणि दिवसा शिक्षण पूर्ण करायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता. या संघर्षमय बालपणानेच त्यांना सामान्य माणसाच्या दुःखाची आणि कष्टाची खरी जाणीव करून दिली.
विचारांची बैठक आणि राजकीय प्रवास… वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांच्यावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या समतावादी विचारांचा पगडा बसला. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सहवासातून त्यांना समाजकारणाची नवी दृष्टी मिळाली. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले आणि वणी पंचायत समितीतील एका मोठ्या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. सत्तेचा वापर केवळ पदासाठी न करता, वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीच झाला पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे.
व्यावसायिक यश आणि सामाजिक बांधिलकी… सामाजिक कार्यासोबतच त्यांनी स्वतःला व्यावसायिकदृष्ट्याही सिद्ध केले. विमा क्षेत्रात बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून तब्बल १२ वर्षे काम करत त्यांनी आपल्यातील संघटन आणि नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवली. चार वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसायही सुरू केला. स्वतः हलाखीच्या परिस्थितीतून वर आल्यामुळे, आजही ते परिसरातील अनेक गरजू आणि होतकरू तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक व मानसिक बळ देत असतात.
‘लढा’ संघटनेच्या माध्यमातून जनआक्रोशाला वाचा… राजकीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन जनसामान्यांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांसोबत ‘लढा’ संघटनेची स्थापना केली. आज ही संघटना वणीतील तरुणांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचे एक प्रभावी व्यासपीठ बनली आहे.
वणी व राजूर परिसरातील जीवघेण्या कोळसा प्रदूषणाविरोधात त्यांनी पुकारलेला एल्गार असो, किंवा १२ गावांतील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारलेले आंदोलन असो, प्रविणभाऊ नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.
यासोबतच ओबीसी समाज आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदार घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.
माणुसकी हाच धर्म…जात, धर्म आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागवणे, हीच प्रविणभाऊंची खरी ओळख आहे. तरुणांना केवळ सभेतील गर्दी न समजता, त्यांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम ते अविरतपणे करत आहेत.
संघाची ताकद आणि जनतेचा विश्वास सोबत घेऊन समाजपरिवर्तनाची ही मशाल अशीच तेवत राहो, हीच अपेक्षा! प्रविणभाऊ खानझोडे यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

























