सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
एखाद्या सरकारी दवाखान्यात उपचाराअभावी महिलेचा जीव जातो, त्यानंतर थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून आरोग्य विभागाचे आयुक्त सुधारणेचे सक्त आदेश देतात… तरीही प्रत्यक्षात त्या दवाखान्यात एका पैशाचाही फरक पडत नसेल, तर याला काय म्हणायचे? वणी तालुक्यातील कायर प्राथमिक आरोग्य केंद्राची आजची अवस्था पाहता, “वरिष्ठांचे आदेश फक्त कागदावरच राहतात आणि स्थानिक प्रशासन अजूनही गाढ झोपेत आहे,” हेच कटू सत्य समोर येत आहे.
एक जिद्दी लढा आणि शासनाचे आदेश…
कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ सप्टेंबर २०२४ रोजी सोनाली लोडे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुरड येथील सुभाष लोडे यांनी कोणत्याही पुढाऱ्याचा आधार न घेता थेट मंत्रालयापर्यंत एकट्याने लढा दिला. त्यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे आरोग्य संचालक कार्यालयाने चार सदस्यांची चौकशी समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी जिल्हा परिषदेला स्पष्ट आदेश दिले होते की, रुग्णवाहिकेवर तातडीने चालक नेमा, ऑक्सिजन व औषधांचा साठा ठेवा, सफाई कामगाराची भरती करा आणि पुरड उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधा. एक सामान्य माणूस जिद्दीने व्यवस्था बदलू शकतो, असा विश्वास या आदेशामुळे निर्माण झाला होता.
मात्र प्रत्यक्षात ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’ अशी अवस्था!
दुर्दैवाने, हे आदेश निघूनही कायर आरोग्य केंद्राचा कारभार सुधारण्याऐवजी अधिकच खालावला असल्याचे धक्कादायक चित्र १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या पाहणीत समोर आले आहे. आरोग्य मंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वी पाहणी पथक आले असता, इथल्या भोंगळ कारभाराचे जे फोटो समोर आले आहेत, ते कोणाच्याही अंगावर काटा आणणारे आहेत:
स्वच्छतेचा बोजवारा: डिलिव्हरी बेडवर न पुसलेले रक्ताचे डाग तसेच पडून आहेत, तर बेडशीटवर पालीची विष्ठा आणि उंदरांनी कुरतडलेले छिद्र दिसत आहेत. शौचालये इतकी घाणेरडी आहेत की तिथे पाय ठेवणेही कठीण आहे.
पिण्याच्या पाण्याशी खेळ: ज्या टाकीतून रुग्ण आणि स्टाफ पाणी वापरतात, त्याच स्टोरेज टाकीवर फरशी पुसायचे फिनाईलचे मॉप ठेवलेले आढळले आहेत. हा थेट विषबाधेला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे.
दप्तर दिरंगाई आणि स्टाफचा अभाव: पाहणी पथकाने औषध साठ्याचे रजिस्टर मागितले तर इथे फार्मासिस्टच नसल्याचे सांगण्यात आले, आणि आवक-जावक रजिस्टर चक्क लॉकरमध्ये बंद ठेवून लपवण्यात आले.
सुरक्षा आणि अतिक्रमण: दारू पिऊन येणाऱ्यांच्या त्रासामुळे चांगले डॉक्टर इथे टिकत नाहीत, तरीही सुरक्षा रक्षक नेमला गेलेला नाही. दवाखान्याच्या गेटवर दुकानांचे अतिक्रमण झाले असून आत गुरेढोरे मोकाट फिरत आहेत.
मूळ प्रश्न: नेमकं पाणी कुठे मुरतंय?
एका बाजूला ‘स्मार्ट पीएचसी’च्या नावाखाली लाखो रुपयांचे नवे बांधकाम केले जात आहे, पण दुसऱ्या बाजूला रुग्णांना साधी स्वच्छ चादर, वेळेवर औषध आणि सफाई कामगारही मिळत नसेल, तर या इमारतींचा उपयोग काय? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
आयुक्तांनी लेखी आदेश देऊनही जर स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी सुधारत नसतील, तर या निष्काळजीपणाला अभय कोणाचे आहे? सुभाष लोडे यांच्यासारख्या सामान्य नागरिकाने जिद्दीने लढून शासनाकडून आदेश आणले, पण त्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच जर ढिम्म असेल, तर गरिबांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार? आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे न नाचवता, दोषींवर थेट निलंबनाची कारवाई करावी आणि कायर आरोग्य केंद्राला खऱ्या अर्थाने ‘आरोग्यदायी’ बनवावे, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

























