सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली उकणी येथे पुकारण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाला मोठे यश आले आहे. वेकोली (WCL) प्रशासन आणि ‘एम/एस नारायणी अँड सन्स’ या कंपनीच्या दारासमोर स्थानिक नागरिकांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने नमती भूमिका घेतली आहे. या दबावापोटी कंपनीने १७ नोव्हेंबर २०२६ पासून वाहनचालक (ड्रायव्हर) व इतर कामगारांच्या भरतीसाठी अधिकृत घोषणापत्र जारी केले आहे.
उकणी आणि परिसरातील सुशिक्षित व कष्टकरी तरुणांना स्थानिक प्रकल्पात प्राधान्य मिळावे, यासाठी संजय खाडे आणि स्थानिक भूमिपुत्रांकडून गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. परंतु, प्रशासनाकडून या रास्त मागण्यांकडे सातत्याने कानाडोळा केला जात होता. अखेर प्रशासनाची ही उदासीनता मोडून काढण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२६ पासून ‘चक्काजाम’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, तर दुसरीकडे कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आले.
भूमिपुत्रांचा हा आक्रमक पवित्रा आणि वाढता रोष पाहता अखेर वेकोली व संबंधित कंपनी प्रशासनाला आपल्या भूमिकेत बदल करावा लागला. तातडीने पावले उचलत प्रशासनाने कामगार भरतीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले, ज्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
“हा लढा माझ्या नेतृत्वाखाली लढला गेला असला, तरी हा खऱ्या अर्थाने उकणीतील प्रत्येक कामगार आणि भूमिपुत्राच्या एकजुटीचा विजय आहे. स्थानिकांच्या हक्कांवर गदा आल्यास यापुढेही रस्त्यावर उतरून असाच निर्णायक संघर्ष केला जाईल आणि भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला जाईल,” अशा ठाम भावना संजय खाडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. या आंदोलनात परिसरातील भूमिपुत्र, तरुण आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

























